Sharad Pawar drought visit: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. वयाच्या 86व्या वर्षी शेताच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत असून, पाणी, चारा, पिकांचे नुकसान आणि शेतीशी संबंधित अडचणी जाणून घेत आहेत. बारामती तालुक्यातील जवळार्जुन येथेही पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना एक मिश्कील किस्सा घडला आणि काही क्षणांसाठी गंभीर वातावरणात हशा पिकला.
‘माझे वडील तुमच्या कृपेने आमदार झाले...’
जवळार्जुन येथे शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत होते. अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळ, पाण्याची टंचाई, चारा आणि शेतीसमोरील अडचणी पवारांसमोर मांडल्या. पवार प्रत्येकाची बाजू शांतपणे ऐकून घेत होते. याचवेळी एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाची पवारांशी असलेली जुनी राजकीय जवळीक सांगताना आठवणींना उजाळा दिला.
“माझे वडील म्हणजे अशोकभाऊ. तुमच्या कृपेने ते आमदार झाले. ते आम्हाला बारामतीला घेऊन यायचे. माझे वडील नेहमी म्हणायचे की, छाती फाडली तरी त्यामध्ये साहेबच दिसतील,” असे या शेतकऱ्याने सांगितले. शेतकऱ्याने व्यक्त केलेल्या या भावनांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
शेतकऱ्याचे कौतुक सुरू असतानाच शरद पवारांनी त्याच्याकडील एक पत्र हातात घेतले. या पत्रावर भाजपचे कमळ चिन्ह आणि भाजपचे लेटरहेड असल्याचे दिसत होते. पवारांनी हे पत्र उपस्थितांना दाखवत त्या शेतकऱ्याकडे पाहिले आणि मिश्कीलपणे विचारले, “मग हे काय आहे?”
पवारांचा हा अनपेक्षित सवाल ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काही क्षणांपूर्वी ‘छाती फाडली तरी साहेबच दिसतील’ अशी निष्ठा व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातील भाजपचे लेटरहेड पवारांनीच दाखवून दिल्याने हा प्रसंग उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, शेतकरी संवादादरम्यान शरद पवारांनी बारामती तालुक्यातील जिरायती भागातील सिंचनाच्या प्रश्नावरही भाष्य केले. जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळावा यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जानाई-शिरसाई सिंचन योजना राबविण्यात आल्या. या योजनांमुळे अनेक गावांमध्ये पाणी पोहोचले असून, शेतीला त्याचा आधार मिळाल्याचे पवारांनी सांगितले.
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मोरगावसह परिसरातील गावांमध्ये पोहोचल्याने अनेक शेतकऱ्यांना ऊसासारखी पिके घेणे शक्य झाले. मात्र, बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शंभर टक्के क्षेत्र अद्याप बागायत करता आलेले नाही, याची खंत असल्याचेही पवारांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या शेतकरी संवादात गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच पवारांच्या या मिश्कील सवालामुळे जवळार्जुनमधील कार्यक्रमातील वातावरण काही क्षण हलकेफुलके झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.