Samruddhi Buldana Bus Accident : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. १ जुलै) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी आहेत. या घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Latest Political Marathi News)
दरम्यान, समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. त्यात अनेकांना जीव गमावावा लागला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गेल्या आठवड्यातच चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर शनिवारी बसचा अपघात झाला. हा अपघात समृद्धीवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी ट्विटद्वारे आपली भावना व्यक्त केली. तसेच जखमी व्यक्ती लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली.
शरद पवार म्हणाले, "बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना." यानंतर त्यांनी अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्याचेही सूचवल्याची माहिती दिली.
पवार म्हणाले, "या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. यावर सरकारे त्वरित उपाययोजना करायला हव्यात. महामार्गावर होत असलेल्या अपघातांबाबत एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून आकडेवारी मागवली होती. ती आकडेवारी चिंताजनक होती. त्यानंतर समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.