Pune, 28 October : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी युगेंद्र पवारांना सल्ला दिला.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीने युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. युगेंद्र पवार यांचं परदेशात शिक्षण झालं असून ते उच्चशिक्षित आहेत. प्रशासन आणि व्यवसायाचा त्यांना चांगला अनुभव आहे. पक्षाने जाणकार अशा तरुणाला बारामतीत संधी दिली आहे. मला खात्री आहे की, बारामतीची (Baramati) जनता या नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाच्या पाठीशी आपली शक्ती लावेल.
आगामी राजकीय वाटचालीसाठी युगेंद्र पवार (Yugendra Pawar ) यांना कोणता कानमंत्र द्याल, असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, मला आठवतं 57 वर्षांपूर्वी मी बारामतीच्या तहसील कार्यालयात माझा फॉर्म भरायला आलो होतो. त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिले आहे. एका व्यक्तीला सलग लोकप्रतिनिधी होण्याची येथील जनतेने संधी दिली, याचं प्रमुख कारण जनतेशी असलेली बांधिलकी.
तरुण पिढीतील उमेदवारांना माझा सल्ला आहे की, जनतेशी बांधिलकी ठेवा. विनम्रता राखा. जनतेची सेवा करण्याची मतदारांनी संधी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्वीकारून त्यांच्या सेवेसाठी सातत्याने जागृत राहा, एवढाच माझा तरुणपिढीतील नेत्यांना सल्ला असल्याचं पवारांनी सांगितलं.
जागा वाटप संदर्भात पवार म्हणाले, जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणच्या जागांसाठी महाविकास आघाडीतील दोन पक्ष आग्रही आहेत. त्या ठिकाणी आम्ही दोघांनाही अर्ज भरण्यास सांगितला आहे. त्या जागासंदर्भात पुन्हा चर्चा करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवकाश असल्याने तोपर्यंत आम्ही मार्ग निश्चित काढू, असं शरद पवार म्हणाले. माढ्यासह काही जागांबाबत चर्चा पूर्ण झाली असून तेथील उमेदवार आज जाहीर होतील.
लाडकी बहीण योजनेबाबत शरद पवार म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांत ज्या सुविधा सरकारने आणल्या आहेत. साडेचार पावणे चार वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती, त्यावेळी त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला बहीण भाऊ या सर्वांची आठवण होऊ लागली आहे. लोकसभेला लोकांनी त्यांना धडा शिकवला असून विधानसभेलाही अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळेल, असंही पवार यांनी नमूद केले.
बारामतीमधील मतदारांबाबत मला जेवढी माहिती असेल, तेवढी माहिती कदाचितच क्वचित काहींना असेल. मला बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शक्ती देण्याचं काम बारामतीच्या जनतेने केले आहे. त्यांची सुरुवात 1965 पासून झाली आणि आजपर्यंत ती सुरू आहे.
सुरवातीच्या काही निवडणुका मला इथे राहावं लागत होतं. त्यानंतर माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली, त्या बारामतीकरांवर माझा विश्वास असून महाविकास आघाडीचे उमेदवार योगेंद्र पवार यांना ते मोठ्या मताधिक्क्याने विजय करतील, असा विश्वासही शरद पवार यांनी बोलून दाखवला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.