Shard Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : शरद पवारांनी वाढवलं टिंगरेंचं टेन्शन; म्हणाले, 'निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते...'

Sachin Waghmare

Pune News : तोंडावर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची बोलणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

खराडी येथील सभेप्रसंगी सुनील टिंगरे यांचे विरोधक बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि दहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पठारेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

दुसरीकडे जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडुन आलास? हा पक्ष कोणी काढला सगळ्या हिंदुस्थानला माहित आहे. तू सोडून गेला ते ठिकाय. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू, पण कल्याणी नगरला भयंकर अपघात झाला. दोघांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असलेल्यांना हा आमदार मदत करत होता. तू मतं पक्षाच्या नावाने मागितली. माझ्या नावाने मतं मागितली आणि आमदार झाल्यावर लोकांना मदत करण्याऐवजी चुकीचे काम करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यांना सत्तेची मस्ती चढलीय, असे म्हणत पवार यांनी हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला फक्त चार आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती. पण मी निर्धार केला की विधानसभेला आपण हे चित्र बदलायचे आणि लोक उभे राहिले. आता तर लोकसभेला आपण 31 जागा जिंकल्या असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी पाऊस आला म्हणून म्हणून पुण्यातील सभा रद्द केली. पण आम्ही ठरवलं की पाऊस आला तरी सभा घ्यायची. पुण्याचं वैशिष्ट्य काय तर कोयता गँग... पुण्याच वैशिष्ट्य आधी काय होतं तर बजाजचा कारखाना , किर्लोस्करांचा कारखाना , विद्येचे माहेरघर आणि आज काय तर कोयता गँग, असे शरद पवार यांनी सांगितलं.

'मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचं योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू 14 वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांची हत्या झाली. राजीव गांधींनी नवीन तंत्रज्ञान आणले. त्यांची हत्या झाली. ही साधीसुधी माणसे नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केले?' असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT