Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची बोलणी सुरु आहे. जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. तर, उमेदवारीसाठी इच्छुकांकडून वरिष्ठांची भेट घेतली जात असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
या सगळ्यात आता महायुतीकडून एकाच मतदारसंघातून अनेक इच्छुक असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे (Bjp) प्रशांत बंब आमदार आहेत. (Mahayuti News )
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या मतदारसंघात काम करत आहेत. मतदारसंघात अस्वस्थता आहे, जसा म्हणावा तसा विकास या मतदारसंघाचा झाला नाही. कार्यकर्त्यांची देखील गेल्या 15-20 वर्षांपासून घुसमट होत आहे. मी काम करत असताना माझ्या लक्षात आले की येथील मतदारांना बदल अपेक्षित आहे. आता सर्व्हे करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे थोडं फार कमी जास्त होईल, पण जनता ज्याला पसंती देते त्यांचे नाव येते. सर्व्हेमध्ये ज्याचं नाव येतं त्याला पक्ष किंवा आघाडी उमेदवारी देते. त्यामुळं लढावं तर लागेल, सर्व्हेमध्ये पण मी पुढे येईल, असे आमदार सतीश चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या बाबत प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, सतीश चव्हाण हे निवडणूक लढणार आहेत याची मला कल्पना आहे. मला कोणाच्यातरी विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी मैदानात यावे, असे आव्हान प्रशांत बंब यांनी दिले. सतीश चव्हाण यांच्या पक्षातील वरिष्ठांना आणि माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना ही सगळी माहिती आहे की ते निवडणूक लढतील. वरिष्ठ काय तो निर्णय घेतील, असे याबाबत बोलताना प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले.
गंगापूरमध्ये 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने-पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. प्रशांत बंब यांना 1 लाख 7 हजार193 मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या माने पाटील यांना 72 हजार 222 मते मिळाली होती. वंचितच्या अंकुश कळवणे यांना 15 हजार 951 मते मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत आता प्रशांत बंब यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.