Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Baramati News : रघुनाथदादा, आपल्या पिढीतील किती सोबती आता उरले आहेत? : पवारांचा भावनिक सवाल

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ‘बीजीदादा तुम्ही माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे असाल ना? रघुनाथदादा, आपल्या पिढीतील आपल्या वयाचे किती सोबती या भागात उरले आहेत?’’ असा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला. त्यावर ‘तिघेजण’ असे उत्तर मिळते. त्यावर उपस्थित लोकही शहारून जातात. (Sharad Pawar meet to old colleagues)

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज बारामती (Baramati) तालुक्यातील वाणेवाडी येथे जाऊन जुने निष्ठावंत सहकारी रघुनाथ भोसले यांची भेट घेतली. १९६७ च्या आधीपासूनचे सहकारी बी. जी. काकडे, कामगार नेते तुकाराम जगताप हेही उपस्थित होते. स्वतः पवार भेटायला आल्याचे पाहून तिघेही अक्षरशः हेलावून गेले होते.

अलिकडेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले, आनंदराव भोसले, रामचंद्र भगत, यशवंतराव काकडे असे पवार यांचे एकेकाळचे सहकारी निर्वतले. यामुळे आता आपल्या वयाचे किती लोक आहेत? असा भावनिक प्रश्न पवार यांनी केला. रघुनाथ भोसले यांच्या जुन्या वाड्यात पवार येऊन गेले होते. त्यामुळे नव्या बंगल्यात कधी रहायला आला, असेही त्यांनी विचारले.

तुकाराम जगताप यांना या वयातही कामगार संघटनेचे काम करतच आहात का?, अशी विचारपूस केली. साखर कारखाना, शिक्षण संस्था चांगल्या चालल्याने या भागातील लोकांचे राहणीमान बदलले असल्याचे इकडे आले की जाणवते, असे कौतुकही पवार यांनी केले.

ऊसतोड मजुरांबाबतची तक्रार लक्ष्मण गोफणे यांनी केल्यावर हार्वेस्टर वापरण्याचा सल्ला पवार यांनी दिला, तर सुनील भगत यांनी हार्वेस्टरला अनुदान मिळावे असे सांगितले. या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, विश्वास जगताप, दत्ताजी चव्हाण, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, हरिभाऊ भोंडवे, तुषार माहूरकर, अनंत तांबे, हरिभाऊ भोंडवे, किशोर भोसले, विक्रम भोसले उपस्थित होते.

‘अण्णांचं घर माहित नाही, असं कसं होईल...’

वाणेवाडी येथे न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी रस्त्यावरून टाटा करताना पाहून पवार यांनी गाडी थांबवत सत्कार स्वीकारला. जुने निष्ठावंत (कै.) शिवाजीराव भोसले यांच्या बंगल्याजवळ महिला उभ्या पाहून तिथेही गाडी थांबविली. चित्रा प्रवीण भोसले यांनी औक्षण करताना 'हे शिवाजीअण्णांचं घर. मी त्यांची सून' असे म्हणातच पवार यांनी, 'अण्णांचं घर माहित नाही, असं कसं होईल' असे सांगितल्यावर भारावलेल्या भोसले कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले. संभाजी भोसले यांच्या घरासमोरही त्यांनी सत्कार स्वीकारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT