Sharad Pawar speaks about the MPSC students’ protest and urges Chief Minister Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

​MPSC protest: "गरज पडली तर..."; MPSC आंदोलनावर शरद पवार अँक्शन मोडमध्ये, फडणवीसांना फोन करून काय म्हणाले?

Sharad Pawar spoke to Devendra Fadnavis over the MPSC students’ protest: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची भूमिका त्यांनी मांडली.

Sudesh Mitkar

MPSC students protest News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित गोंधळ, पेपरफुटीच्या प्रकरणांसह विविध मागण्यांवरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता असून सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण फोनवरून संपर्क साधल्याचेही पवार यांनी सांगितले.

पुण्यात मागील काही दिवसांपासून MPSC करणारे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आयोगाच्या कारभारातील कथित गोंधळ, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवरून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

मात्र, आंदोलनाची व्याप्ती वाढत असतानाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनातच फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलनासाठी बसले असून, त्यांच्या मागण्यांमध्येही काही प्रमाणात फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांशी आणि कोणत्या मागण्यांवर चर्चा करायची, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. गेले काही दिवस राज्यात, विशेषता पुणे, मुंबई आणि अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काही मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. त्यांची नोंद घेऊन राज्य सरकार आणि संबंधित शिक्षण संस्थांनी यातून मार्ग काढण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे,असे पवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवादातून तोडगा काढण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधींनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली पाहिजे. चर्चेने प्रश्न सुटतात. यातून मार्ग काढला पाहिजे असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, अशी माहिती पवार यांनी दिली. मुख्यमंत्री सध्या मुंबईत नाहीत. ते मुंबईला आल्यानंतर या प्रश्नात लक्ष घालून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी विनंती मी त्यांना केली आहे. गरज पडली तर विद्यार्थ्यांना भेटा, बैठक घेऊ; पण राज्य प्रमुखांनी हा निर्णय घ्यावा असे पवार म्हणाले.

‘विद्यार्थ्यांना न्याय देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी’

MPSC आंदोलनावरून राज्य सरकारवर दबाव वाढत असताना पवारांनी सरकारच्या नैतिक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. मुख्यमंत्री उद्या मुंबईत येतील, चर्चा करतील आणि यातून मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा करावी. सरकार काय निर्णय घेते, हे उद्या स्पष्ट होईल असे पवार यांनी सांगितले.

पुण्यापासून मुंबईपर्यंत आंदोलन

MPSC आंदोलनाचा मुद्दा आता केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. मुंबईसह राज्यातील विविध भागांतही विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा पवार यांनी केला. त्यामुळे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT