Pune News, 04 Oct : ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत असतानाच एक भलतीच राजकीय आणि गुन्हेगारी नाट्यमय घडामोड समोर आली आहे. शरद पवार यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कार्यकर्त्यांचे खिसे तर कापलेच, पण चक्क शरद पवारांच्याच ताफ्यातील वाहनात बसून त्यांनी आपली 'सवारी' पुढे नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील परिंचे, मांडकी, वाल्हे आणि राख या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. वाल्हे (ता. पुरंदर) येथे पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. या गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा उठवत सराईत चोरट्यांनी हात साफ केला.
दौरा पुढे निघून गेल्यानंतर वाल्हेचे माजी सरपंच अमोल खवले यांचे ५ हजार ८२० रुपये आणि राजेंद्र राऊत यांचे १९ हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे स्पष्ट होताच माजी सरपंचांनी तातडीने ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज पाहताच उपस्थितांचे डोळे पांढरे झाले; कारण संशयित चोरटे थेट शरद पवारांच्या ताफ्यातीलच एका वाहनात ऐटीत बसून प्रवास करत असल्याचे दिसून आले!
कार्यकर्त्यांचे 'फिल्डिंग' आणि थरारक पाठलाग
माजी सरपंच अमोल खवले यांनी विलंब न लावता फुटेजमधील चोरट्यांचे फोटो आणि वाहनाची माहिती ताफ्यात पुढे असलेल्या पुष्कराज जाधव, संदेश पवार, गणेश होले, श्रीपाद गुरव, सुभाष दुर्गाडे या कार्यकर्त्यांना पाठवली. माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवत संशयित वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. संशयितांचे वाहन ताफ्याबाहेर पळून जाऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांनी स्वतःची वाहने पुढे-मागे लावून एकप्रकारे 'फिल्डिंग' लावली.
निरा येथे 'गेम ओव्हर'; जेजुरी पोलिसांत रवानगी
दौऱ्याचा ताफा निरा येथे पोहोचताच स्थानिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी संशयितांवर बारीक लक्ष ठेवले. तिथेही गर्दीत पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न करत असतानाच दोन भामट्यांना नागरिकांनी आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी चौघांना जेजुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हे चौघेही माळशिरस परिसरातील सराईत चोरटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयितांचे चेहरे आणि वाहनाची माहिती वेळेत मिळाली. कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळेच दौऱ्यादरम्यान चोरी करणाऱ्या या भामट्यांना पकडण्यात यश आले असे माजी सरपंच, वाल्हे अमोल खवले यांनी सांगितले .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.