Sharad Pawar, Sambhaji Raje Chhatrapati
Sharad Pawar, Sambhaji Raje Chhatrapati sarkarnama
पुणे

राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा देणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणात राजकारण रंगले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न पवार त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, शिवसेना (shivsena) जो उमेदवार देईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुण्यामध्ये ब्राम्हण समाजाच्या प्रतिनिंधींसोबत शरद पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, आमची एक जागा निवडून जाऊन आमच्याकडे काही मते शिल्लक आहेत. ती मते शिवसेनेच्या उमेदवाराला देणार आहोत.

दोन वर्षापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की आम्हाला दोन जागा पाहिजे. त्यावेळी त्यांनी ती विनंती मान्य केली होती. त्यामुळे आता दुसरी जागा शिवसेना लढवणार आहे. त्यामुळे शिवसेना जो उमेदवार देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. इतर कोणालाही नाही. शिवसेना ठरवेल त्यालाच मतदान करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट सांगितले. संभाजीराजे असोत किंवा दुसरा कोणीही असो, असे पवार म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढण्यावर ठाम असल्याचे वरिष्ट सूत्रांकडून कळते आहे. संभाजीराजे यांना शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता, अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी वेगाने घडामोडी घडत आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, सहावी जागा शिवसेना (Shivsena) लढविणार असल्याने संभाजीराजे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली होती. यात उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंपुढे शिवसेनेत येण्याची आणि शिवसेनेचा प्रचार करण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती.

या चर्चेदरम्यान शिवसेनेने संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, संभाजीराजे यांनी माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला. त्यावर ठाकरे यांनी संभाजीराजेंना ४ अटी घातल्या. मात्र, या अटींचा तपशील ऐकताच ते नाराज झाले. या अटींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्थाव संभाजीराजेंनी दिला असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT