Sharad Pawar |Nashik Graduate Constituency Election  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : पवारांनी दाखवला आशेचा किरण : 'नाशिक'चा प्रश्न अजूनही सुटू शकतो!

सरकारनामा ब्यूरो

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून राजकीय नाट्य रंगले आहे. शुभागी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानंतर आता नवीन अपडेट समोर येत आहे. सत्यजीत तांबे यांचे वडील व काँग्रेसचे माजी आमदार सुधीर तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, "तरूण नेत्याचा त्या ठिकाणी फॉर्म भरला, याच्यातून वाद घडून आला. खरं तर बसून हा वाद सोडवता आला असता. ज्यांनी फॉर्म भरला तो काही पक्षाच्या बाहेरचा होता असे नाही. गेली चार पाच वर्षे त्यांचं तरूणांमध्ये काम होतं. सगळ्या प्रमुख लोकांना बोलवून यातून मार्ग काढला गेला असता. कदाचित अजूनही मार्ग निघू शकतो. मात्र वाद झाले नसते, असं अजूनही मला वाटतं.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना नाशिकच्या जागेबाबत केलेल्या सावधानगिरीच्या सल्ल्यावर पवार म्हणाले, 'ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. काँग्रेसचे ते नेते आहेत. विधानसभेचं नेतृत्व असलेले काँग्रेसचे नेते आहेत. गेली अनेक वर्षे ते सातत्याने काँग्रेसचं काम करतात. त्यामुळे थोडं सामंजस्य दाखवलं असतं तर, हा प्रश्न सुटला असता, असं पवार म्हणाले.

नाशिक पदवीधरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खेळ केला का? असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले,'कोणीतरी या परिस्थितीचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर, माझं त्यांना काही म्हणणं नाही. कोणाला याचा आनंद घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असा चिमटाही पवारांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT