Sharad Pawar @ Kanheri Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : सत्ता त्यांची अन् हिशोब मला मागतात; शरद पवारांनी उडवली अमित शाहांची खिल्ली

Supriya Sule Campaign from Kanheri Maruti Temple : कन्हेरी येथे मारुती मंदिरात नारळ फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला शुभारंभ

Sunil Balasaheb Dhumal

रवीकिरण सासवडे

Baramati Political News : देशाचे गृहमंत्री अमित शाह Amit Shah महाराष्ट्रातील अनेक सभांमध्ये दहा वर्षांत शरद पवारांनी काय केले, असा सवाल उपस्थित करतात. खरे पाहता गेल्या दहा वर्षांपासून देशात भाजपची BJP सत्ता आहे. सत्तेमध्ये ते स्वतः असताना मला विचारतात की मी दहा वर्षांत काय केले? सत्ता त्यांच्याकडे आणि हिशोब मला मागतात, अशी गंमत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानाची खिल्ली उडवली.

कन्हेरी (ता. बारामती) येथील श्रीक्षेत्र मारुती मंदिरात नारळ फोडून शुक्रवारी (ता. १९) परंपरेप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पवार म्हणाले, कन्हेरी येथील मारुती मंदिरातून सुरुवात केली की, यश हमखास मिळते. देशातील ५४३ खासदारांमध्ये पहिल्या दोन खासदारात सुप्रिया सुळे यांचे नाव आहे. ही सोपी गोष्ट नाही. देशात आज काहीतरी वेगळे घडत आहे. हे वेगळे घडत असताना तुमच्या अधिकारावरदेखील गदा येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री बंगळुरू येथे म्हणतो की, आम्हाला या देशाची घटना बदलायची आहे. यावरूनच त्यांचे हेतू स्पष्ट होतात. आज पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, जे तुम्ही पिकवता त्या पिकाला दर नाही. साखर, दूध वेगवेगळी पिके यांच्या दरांची सद्यःस्थिती काय आहे? ज्यातून तुमच्या खिशात पैसे येतील ते स्वस्त करायचे आणि ज्या माध्यमातून त्यांचे खिसे भरले जातील ते महाग करायचे. वरच्या खिशात तुम्हाला अनुदान द्यायचे आणि खालच्या खिशातून काढून घ्यायचे. अशा पद्धतीचे काम सध्या सुरू आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार Sharad Pawar यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला.

अजित पवारांना कोपरखळी....

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी आपले चिन्ह बदलले आहे. तुतारीच्या चिन्हासमोरील बटन आपल्याला दाबायचे आहे. काही लोकांनी ते कसे दाबायचे सांगितले तसे आपल्याला दाबायचे नाही, अशा शब्दांत पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोपरखळी मारली. तसेच आपल्याला वाद संघर्ष वाढवायचा नाही. माझे बटन दाबले तर मी तुमच्यासाठी काम करेन असा प्रकार येथे नाही. देण्या-घेण्याच्या गोष्टी मी करणार नाही, तर मनापासून लोकांचे काम करायचे, असेही या वेळी शरद पवारांनी सांगितले.

दरम्यान, सन 1967 पासून प्रत्येक निवडणुकीत शरद पवार याच मंदिरातून नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतात. याशिवाय वेळ मिळेल तसे आणि बारामतीत असल्यानंतर ते अनेकदा सहकुटुंब दर्शनालाही येतात. त्यानुसार आजही खासदार सुळे यांच्या प्रचाराचा नारळ येथेच फोडण्यात आला. या वेळी आमदार संजय जगताप, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, रणजित पवार आदी मान्यवरांसह राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

९६ वर्षांचे गुरुजी आणि साहेबांची ओळख

पवारसाहेब भाषणाला उभे राहताच उपस्थित नागरिकांमधून एकच जयघोष झाला. 'देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो म्हणत दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. श्रोत्यांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक समोर बसले होते. त्यांपैकी एक गुरुजी असून ते सध्या ९६ वर्षांचे आहेत. त्यांना सर्वांना शरद पवार यांनी ओळखले. त्यांनी ओळख देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

(Edited by Sunil Dhumal)

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT