Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad: अजितदादांच्या आवडत्या शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी तरुण टीम; महापालिका निवडणुकीला भिडणार?

NCP Crisis : पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी लागली कामाला; केली नवी शहर कार्यकारी समिती जाहीर

उत्तम कुटे

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे बहुतांश पदाधिकारी अजितदादांबरोबर गेले.

काही तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र, पवारसाहेबांना साथ दिली. या तरुणांच्या मदतीनेच पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा नव्याने भरारी घेण्याची तयारी राष्ट्रवादीने (शरद पवार गट) आता सुरु केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पदाधिकारी अजितदादांबरोबर गेल्याने या शहरासाठी नऊ जणांची नवी कार्यकारी समिती आज (ता.१७) जाहीर केली. यामध्ये पवारसाहेबांबरोबर राहिलेले नव्या दमाचे तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे त्यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ लगेच मिळाले. येत्या दोन दिवसांत पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे नव्या कार्यकारी समितीत असलेले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

त्यांच्यासह शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, अर्बन सेल अध्यक्ष काशीनाथ जगताप, राष्ट्रवादीशी संलग्न कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते तसेच राजन नायर, शीला भोंडवे, प्रशांत सपकाळ, मयूर जाधव आणि फुटीअगोदर साडेचार महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत आलेले वंचित बहुजन विकास आघाडीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा या समितीत समावेश आहे.

आता राष्ट्रवादीचा अध्यक्षही लवकरच निवडला जाणार आहे. तोपर्यंत ही समिती कामकाज करणार आहे. दरम्यान, पक्षासाठी दुसऱ्या कार्यालयाचाही शोध सुरु झाला आहे. दोन-तीन जागा पाहण्यात आल्या असून त्यातील एक फाईनल करून कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते जंगी स्वरुपात येत्या आठवडाभरात करण्याचा पक्षाचा मानस आहे.

दरम्यान, आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आतापर्यंत एकत्र लढलेले आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी होणार आहेत. परिणामी पिंपरी महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी आतापर्यंत अपेक्षित असलेली ही लढत आता काही अंशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी (एक गट महायुतीत, तर दुसरा आघाडीबरोबर) अशी होण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT