मंचर : शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी मंचर येथे महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा राजीना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घ्यावा, अशी मागणी केली. महाविकास आघाडीला घरचा आहेर देण्याचे काम सोनवणे यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नारायणगाव ते मंचर पायी मोर्चाचे आयोजन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपसरपंच व शेतकरी सहभागी झाले होते. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे कृषी पंपांची वीज तोडत असल्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मंचर येथे झालेल्या सभेत सोनवणे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीचा निषेध केला.
सोनवणे म्हणाले "शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही. वीज बिलाची टप्प्याटप्प्याने वसूली करा, असे जाहीरपणे सांगतात. मात्र, खाजगीत वीज तोडत आहेत. याप्रकरणी पवार व नितीन राऊत यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा" अशी मागणी सोनवणे यांनी केली. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेना नेते सोनवणे यांनी केलेल्या मागणीमुळे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दिवाळीपर्यंत वीज खंडित करणार नाही, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली. यावेळी सुरेशराव भोर. देविदास दरेकर, अरुण गिरे, प्रसन्न डोके, गुलाब पारखे राजाराम बाणखेले, शरद चौधरी, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, सचिन राव बांगर मालती थोरात, कल्पेश बाणखेले, आदी मान्यवर आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.