Pune News : पिंपरी- चिंचवड शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पिंपरी चिंचवड भाजप (BJP) शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत चार प्रमुख आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू होती.
आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आणि जुन्या गटाचे पदाधिकारी या शर्यतीत होते. या जुन्या गटांमध्ये माजी खासदार अमर साबळे आणि आमदार उमा खापरे यांचा समावेश होता. या चारही गटांनी आपल्या गटातील नेत्याकडे शहराध्यक्षपद राहावं यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.
त्यानुसार शहराध्यक्षपदासाठी 8 नावांची जोरदार चर्चा होती. यामध्ये जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक यांच्या नावांची चर्चा होती. तर नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजय फुगे इच्छुक होते.
मागील काही काळापासूनचा पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाचा इतिहास पाहिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारच शहराध्यक्ष असावा असं धोरण ठरवलं होतं. त्यामुळे सुरुवातीला लक्ष्मण जगताप आणि नंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे(Mahesh Landge) यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
मात्र, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जानेवारी 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची यावरून जगताप कुटुंबामध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळाला. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर शंकर जगताप यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
मात्र, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शंकर जगताप आमदार झाले. मात्र, या निवडणुकीदरम्यान भाजपाचा एक गट नाराज असल्याने या गटाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून शत्रुघ्न काटे यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर शहराध्यक्ष निवडीबाबतच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काटे यांनी आपल्याला पूर्णवेळ अध्यक्ष करावे यासाठी आग्रह धरला होता.
मात्र, काट्यांच्या मार्गामध्ये काटे पेरण्याचा प्रयत्न पिंपरीमधील अनेक नेत्यांनी केल्याचं बोललं गेलं. पण अखेर काटे यांच्यावरती पक्षनेतृत्वाने विश्वास दाखवला असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.