Pune, 28 May : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. त्यात आता पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्याची विधान परिषदेची जागा नेमकी कोणाला सुटणार, यावरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आलेली असतानाच, आता शिरूर तालुक्यामध्ये आणखी एका हायव्होल्टेज निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अनेक वर्षे बाजार समिती ताब्यात ठेवणारे माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून मध्यंतरी बाजार समितीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती, त्यामुळे पवार यांच्यापुढे आणखी एक संस्था ताब्यात घेण्याचे मोठे चॅलेंज असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याप्रमाणे दीर्घकाळ रखडल्या होत्या, अगदी त्याचप्रमाणे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबतही संपूर्ण तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमास अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली होती. त्यानंतर तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता पुन्हा ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी तातडीने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम २०१७ अन्वये राबविण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, पुणे ग्रामीण) यांनी या निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, येत्या २९ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. येत्या ५ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल, त्यानंतर २२ जून ही अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. २३ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष राजकीय आखाडा रंगणार असून ५ जुलै रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत कृषी संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असणार आहे. प्रशासनाने संबंधित सर्व घटकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील सध्याची एकूणच बदललेली राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गटबाजी आणि अंतर्गत बंडखोरी पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील दिग्गज नेते पुन्हा एकदा परस्परांविरोधात दंड थोपटून उभे ठाकणार आहेत.
माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके आमने सामने येणार आहेत. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये बाजार समितीसाठी निवडणूक होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पवार यांच्यासेाबत भाजपमधील एक गट जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सहकारी क्षेत्रावर आपलेच वर्चस्व आहे, हे दाखवून देण्यासाठी माजी आमदार अशेाक पवार यांना संधी चालून आली आहे. त्यांना आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे आव्हान असणार आहे. बाजार समितीवर कोणाचा झेंडा फडकतो, याकडे आता संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.