Shivajirao Adhalrao Patil, Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Election: ...तर नावडती सूनदेखील; महायुतीतील नाराजीवर चंद्रकांत पाटलांची कबुली

Shivajirao Adhalrao Patil News: शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत. आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा विरोध होता.

Sudesh Mitkar

Shirur Lok Sabha Election 2024 : शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासाठी फिल्डिंग लावण्याचं काम, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी आज केलं. मात्र, महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून अद्यापही नाराजी असल्याचं स्पष्ट झालं आहे, तर या युतीतील नाराजीबाबत खुद्द चंद्रकांत पाटलांनी कबुली दिली आहे. कारण बैठकीत बोलताना त्यांनी 'सून चांगली असेल तर नावडती सूनदेखील सर्वांची आवडती होते' असं उदाहरण दिलं आहे.

आगामी शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha Election) निवडणुकीसाठी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत. आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे आढळरावांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी याबाबत जाहीर नाराजीदेखील व्यक्त केली होती. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात अजित पवारांना (Ajit Pawar) यश आल्याचे पाहायला मिळत आहे. असं असताना दुसरीकडे आता भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य समोर आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचे सांगत भाजपचे (BJP) काही नेते आजच्या बैठकीला गैरहजर राहिले होते. नाराजी नाट्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, एखाद्या मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं, तर काही दिवस कुटुंबात खदखद असतेच, पण ती सून चांगली असेल तर ती सर्व कुटुंबाची आवडती बनते. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत खदखद असल्याचं उघडकीस आलं.

बैठकीला गैरहजर असलेल्या नेत्यांबाबत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीच्या मतदानाला अजूनही चाळीस दिवस आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणाचा फोटो नाही कोणाची उपस्थिती नाही या छोट्या-छोट्या चुका सुधारल्या जातील. कोणत्याही कुटुंबात अगदी कुटुंबातील रक्ताच्या नात्यातही कुरघोडी सुरूच असतात. त्यामुळं हे वाद संपविण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखाची असते. इथं तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते-पदाधिकारी आहेत. त्यांची ध्येय-धोरणं आहेत, त्यामुळं तेवढं चालायचं, असं सांगत नाराजीच्या मुद्द्यावरती चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

नाराजी दूर करण्यासाठीच बैठक

दरम्यान, आजच्या समन्वय बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, नाराजीबाबत चर्चा होत असली तरीही नाराजी दूर करण्यासाठीच तिन्ही पक्षांमध्ये समन्वय बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय साधून आगामी काळामध्ये आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT