Pune Political News : पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महायुतीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत हे दोन्ही उमेदवार आपला प्रचार करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडिया, फेसबुक, यासह ट्विटर, यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आजच्या काळात बहुतेक नागरिक हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने याचा अधिकाधिक वापर राजकीय पक्षांकडून केला जात आहे.
याच सोशल मीडियाचा वापर करून आता भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे ट्रोलिंग सुरू केले आहे. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, आयटी हब अशी ओळख पुणे शहराची आहे.
या शहराचा खासदार हा उच्चशिक्षित असला पाहिजे. दिल्लीत गेल्यानंतर त्याने आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करत शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, हा उमेदवार कमी शिकलेला असेल तर त्याचे दिल्लीत काय चालणार, असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने आता त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’,‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !’, ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहिलेला आणि धंगेकर यांचा फोटो असलेला मेसेज सध्या जोरदार सोशल मीडियावरून व्हायरल केला जात आहे.
शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आमदार धंगेकर यांना ट्रोल करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे मेसेज वेगवेगळ्या समाज माध्यमांवरून पाठविले जात आहेत. यामध्ये भाजपच्या (BJP )पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे.
सोशल मीडियावर होत असलेल्या या ट्रोलिंगवर महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते माझ्या शिक्षणावर बोलतात याचा अर्थ त्यांना पराभव स्पष्ट दिसतोय, असे सांगत जनतेमध्ये माझी पीएचडी झाली आहे. मला जनतेने पीएचडीचं सर्टिफिकेट दिले आहे, हे विरोधकांना लवकरच लक्षात येईल, असे धंगेकर म्हणाले.
भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. देशात मोदी यांची हवा आहे, असा दावा सतत भाजपकडून केला जातो, मग काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांची गरज भाजपला का पडली, असा प्रश्न धंगेकर यांनी विचारला आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावरून प्रसिद्ध करून एकमेकांना ट्रोल करण्याचे प्रकार सुरूच राहणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.