Sachin Ahir Sarkarnama
पुणे

...,तर शिवसेना स्वबळावर लढणार

शिवसेना (Shivsena) स्वबळावर भगवा फडकवेल, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वी केला होता.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी 2017 साली मोठ्या विश्वासाने भाजपला (BJP) महानगरपालिकेत सत्ता दिली. पण, त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे. म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC & PMC) सत्ताधारी भाजपला खाली खेचण्यासाठी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) एकत्र येणे गरजेचे आहे. आघाडी होणे आवश्यक आहे. म्हणून तसा प्रस्ताव पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे दिला आहे. हे या दोन्ही ठिकाणी मोठे पक्ष आहेत. त्यामुळे त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. अन्यथा शिवसेना स्वबळावर लढायला तयार आहे, अशी भूमिका शिवसेनेचे संपर्कनेते आणि माजी मंत्री सचिन अहीर (Sachin Ahir) यांनी गुरुवारी (ता.9 डिसेंबर) पिंपरी-चिंचवडमध्ये मांडली.

शिवसेना स्वबळावर पुणे, पिंपरींत भगवा फडकवेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच्या शहर भेटीत केला होता. त्यानंतर अहिर यांच्या या वक्तव्याने शिवसेना काहीशी सामंजस्याच्या पावित्र्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने केलेली पाच मोठी कामे सांगावी

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच नाही, तर कॉंग्रेसबरोबरही आघाडीची शिवसेनेची तयारी आहे. पण, कॉंग्रेसमध्ये त्यासाठी बोलायचे कुणाशी अशी कोपरखळी अहिर यांनी यावेळी मारली. पिंपरी-चिंचवडसह पुणे पालिकेत भाजप सत्तेत येईल, अशी स्थिती नाही, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. त्यामुळेच अमित शहांसाऱख्या मोठ्या व केंद्रातील नेत्यांना या निवडणुकीत बोलवण्याची पाळी भाजपवर आल्याची टीका त्यांनी केली. पिंपरी-चिंचववडमध्ये गेल्या पाच वर्षात भाजपने शहराचा विकास झाला, जनतेचा फायदा झाला, अशी केलेली पाच मोठी कामे सांगावीत, असे आव्हान त्यांनी दिले. ते सांगितले, तर आपण त्यांचे आभार मानू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कारण ते अयशस्वी झालेत. सत्तेचा फक्त त्यांनी दुरुपयोगच केला आहे, असे ते म्हणाले. संपर्कनेते म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर प्रथमच ते शहरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, महिला शहर संघटक ॲड. उर्मिला काळभोर, नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर आदित्य ठाकरे दत्तक घ्यायला तयार आहेत.

पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक ही शिवसेना स्थानिक खासदार वा इतर नेत्याच्या नेतृत्वात लढणार नसून तिचा चेहरा हा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख तथा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे असणार असल्याचे अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहर हे आदित्य ठाकरे दत्तक घ्यायला तयार आहेत. पण, त्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी साथ दिली पाहिजे, असे ते म्हणाले. काहींनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असून काही त्या तयारीत असले, तरी या पालिका निवडणुकीत पक्षाची स्थिती शहरात सुधारेल. तसेच, वॉर्डरचना जाहीर झाल्यानंतर पक्षात इनकमिंग होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ओबीसी आऱक्षणासह निवडणूक ही शिवसेनेची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

स्थायी समिती सदस्य निवडीत पक्षादेश डावलला म्हणून गटनेतेपदावरून पक्षाने हकालपट्टी केलेले नगरसेवक राहूल कलाटे हेच गटनेते आहेत, राहतील, हे स्पष्ट करताना नव्या गटनेत्याच्या चर्चेवर त्यांनी कायमचा पडदा पाडला.

स्मार्ट सिटीच्या कामात पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ते राज्यात सत्तेत आहेत. त्यांचाच मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री आहे. तरीही ते या घोटाळ्याची चौकशी का करत नाही आणि उलट चौकशीची मागणी का करतात, अशी विचारणा केली असता या चौकशीची एक प्रक्रिया असते, असे त्यांनी सांगितले. तसेच ती लावली, तर आकसाने सुरु केली, असा आरोप होईल, असे सावध उत्तर त्यांनी दिले. त्याचवेळी या प्रकरणी पालिका आयुक्त राजेश पाटील यांचा अहवाल आल्याने नजीकच्या काळात चौकशी लागेल, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT