Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
पुणे

Pune Congress : विधानसभेच्या 6 जागांवर मित्र पक्षांचा दावा, ठाकरे-पवारांच्या शिलेदारांना काँग्रेसचा टोला

Pune Mahavikas Aghadi : पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आठ पैकी 6 विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही सहा जागांवरती दावा ठोकण्यात आला.

Sudesh Mitkar

Pune News, 16 June : लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी विधानसभेच्या जागांवर दावा करायला सुरुवात केली आहे.

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाकडून आठ पैकी 6 विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही सहा जागांवरती दावा ठोकण्यात आला. त्यामुळे आता जागा वाटपावरुन आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असतानाच काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली आहे. जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठांवर सोडा असा सल्ला मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना काँग्रेसने दिला आहे.

या सगळ्या घडामोडींवर 'सरकारनामा'शी संवाद साधताना पुणे काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, "आघाडीतील माझ्या मित्र पक्षातील शहराध्यक्षांना एवढीच विनंती आहे की, जागा वाटपाबाबतचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील. पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे उद्दिष्ट एकच असून पक्षश्रेष्ठी ज्याप्रमाणे जागावाटप करतील त्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. त्यामुळे वेगवेगळी वक्तव्य करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये."

तसंच राष्ट्रवादीकडून पुण्यातील 6 जागांवर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांच्याशी बोलणं झालं. यापुढे आघाडीत बिघाडी होईल अशी वक्तव्य कुणीही करू नयेत, याबाबत तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेणार असल्याचंही शिंदे म्हणाले. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कामगिरी केली. तीच कामगिरी विधानसभेमध्ये अबाधित राखू आणि आघाडी महापालिका निवडणुकीत देखील अशीच ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वरिष्ठ जागा वाटपाबाबतचा निर्णय घेण्यास सक्षम

जागा वाटपाचा फार्मूला पूर्वीच ठरला आहे. मात्र ज्याप्रमाणे लोकसभेला ज्या पद्धतीने जागा एकमेकांसोबत एक्सचेंज केल्या गेल्या. तसेच वाढीव जागा एकमेकांना देण्यात आल्या. त्याच पद्धतीने विधानसभेलाही वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाचे निर्णय घेतला जाईल. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आपले जे म्हणणे आहे ते वरिष्ठांपर्यंत पोहचवावे आणि त्यावर वरिष्ठांना निर्णय घेऊ द्यावा. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ जागा वाटपाबाबतचा निर्णय घेण्यास सक्षम असून याची काळजी पुण्यातील शहराध्यक्षांनी करु नये, असा टोला शिंदेंनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT