Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास सांगितल्याचे न पटल्यानेच शिवसेना सोडली : आढळराव

ज्या मतदार संघाचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले तो मतदार संघ सोडून पु्ण्यातून लढण्याचा अजब सल्ला दिला गेला.

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : ‘‘लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ज्यांच्याशी गेल्या तीन निवडणूकांत संघर्ष करून दैदीप्यमान विजय ज्या पक्षाला मिळवून दिला, त्याच पक्षाच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) जुळवून घेण्याच्या सूचना केल्याने राजकीय पर्यायच खुंटला म्हणून शिवसेनेपासून दूर जावे लागले,’’ असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आज 'सरकारनामा' शी बोलताना स्पष्ट केले. (Shivajirao Adhalrao Patil says 'why he join Eknath Shinde's group)

सुरवातीला खेड लोकसभा मतदार संघाचे दोनदा व शिरूर लोकसभा मतदार संघाच्या स्थापनेनंतर सुरवातीलाच असे सलग तीन वेळा शिवसेनेचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या आढळराव यांनी राष्ट्रवादी विरोधात कसेबसे पुन्हा पाय रोवत संघर्ष पेटता ठेवला असतानाच राज्यातील तत्कालीन सत्तासंघर्षाच्या घडामोडीत शिवसेनेने चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसशी आघाडी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तीनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी शिवसैनिकांची गोची झाल्याचा आरोप झाला. शिरूर लोकसभा मतदार संघही याला अपवाद राहिला नाही.

दरम्यान, राज्यात नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर बहुसंख्य आमदारांबरोबरच; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करण्याचा सपाटा सुरू केल्यानंतर या फुटीर पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचा एककलमी कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजीराव आढळराव हे शिवसेनेतच असताना आणि बदलत्या घडामोडीत त्यांनी कुठलीही भूमिका बदलली नसतानाही त्यांच्या उपनेतेपदावरून हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर ती कारवाई मागे घेत खुद्द ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला, असे वाटत असतानाच आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट दिल्ली गाठत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जाहिर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीत आढळराव पाटील यांची पुन्हा उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, उद्या पत्रकार परिषदेत सर्व राजकीय भूमिका विशद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "मोठी पडझड होत असताना पक्षाशी प्रामाणिक राहूनही कारवाई करण्यात आली. नंतर कारवाई मागे घेतली. पक्षप्रमुखांनी भेटायला बोलाविले असता काही तथाकथित श्रेष्ठींकडून राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या मतदार संघाचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले तो मतदार संघ सोडून पु्ण्यातून लढण्याचा अजब सल्ला दिला गेला. हे सर्व अनाकलनीय होते. पुण्यातून लढायला सांगणे एकवेळ समजण्यासारखे होते. परंतु ज्यांच्याविरोधात तीन निवडणूकांबरोबरच आयुष्यभर राजकीय संघर्ष केला त्यांच्यासोबत जुळवून घ्यायला सांगणे मात्र मनाला पटले नाही. राष्ट्रवादीसोबत ॲडजेस्ट करून त्यांचा प्रचार करा, असे जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु ते कसे शक्य आहे." तसे करता येणे शक्य नसल्याने माझ्यासमोर त्यामुळे पर्यायच राहिला नाही आणि म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले, असे त्यांनी स्पष्ट केले.

आढळरावांच्या नव्या वाटचालीस कोल्हेंकडून शुभेच्छा

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शिरूर चे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आढळराव पाटील यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आढळराव हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी नवीन निर्णय पुर्ण विचाराअंतीच घेतला असेल. माझा त्यांच्याविषयी आदर असून त्यांच्यसाठी माझ्या नक्कीच शुभेच्छा असतील, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT