Parth Pawar & Shrirang Barne Sarkarnama
पुणे

खासदार बारणेंच्या टीकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस गप्प का?

Shrirang Barne|Ajit Pawar|Parth Pawar|Shivsena|NCP: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : श्रीरंग बारणे (Shirang Barne) खासदार असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ २०२४ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यासाठी शिवसेनेने (Shivsena) सोडावा आणि बारणेना राज्यसभेवर पाठवावे, अशी विनंतीवजा मागणी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतीच केली. त्यावर खासदार बारणे यांनी पक्षाच्या शिवसंवाद यात्रेत शरसंधान केले. मात्र, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने अद्याप त्याला प्रत्युत्तर दिलेले नाही. दुसरीकडे पार्थ यांच्या नेतृत्वातच आगामी पिंपरी महापालिकेच्या निवडणूक (PCMC Election 2022) होणार आहे. तरीही शहर राष्ट्रवादी खासदार बारणेंनी केलेल्या टीकेवर गप्प असल्याबद्दल त्याची चर्चा आहे.

पिंपरी-चिंचवडमधील व त्यातही शिवसेना, राष्ट्रवादीतील गावकी भावकीचे आणि नात्यागोत्याचे राजकारण आणि आगामी पालिका निवडणूक त्यांनी एकत्र लढण्याचा केलेला निश्चय यामुळे राष्ट्रवादीने आपल्या लाडक्या नेत्यावर टीका होऊनही त्यावर सूचक मौन बाळल्याचे समजते. लोकसभा आणि महापालिका निवडणुकीचे राजकीय गणित वेगवेगळे असल्याने बारणेंच्या टीकेवर उत्तर देऊन स्थानिक निवडणुकीचे समीकरण बिघडवण्याच्या मनस्थितीत शहर राष्ट्रवादी नसल्याचे त्यांच्या सूचक मौनातून स्पष्ट होत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील व त्यातही खेड, आंबेगाव, जु्न्नरमधील शिवसेना, राष्ट्रवादीतील कलगीतुरा आता राज्यभर पसरू लागला आहे. बारणे प्रकरणामुळे तो पिंपरी-चिंचवडलाही येण्याची शक्यता होती. मात्र, राष्ट्रवादीने सबूरीने घेतल्याने येथे या दोन पक्षात बेबनाव अद्याप, तरी निर्माण झालेला नाही. २०१२ नंतर २०१७ ला शिवसेनेचे पिंपरी पालिकेतील संख्याबळ घटले. ते २०२२ ला आणखी घटण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्यातील एक नगरसेवक भाजपमध्ये गेला असून आणखी काही जय महाराष्ट्र करण्याच्या विचारात आहेत. पक्ष व पालिकेतील संख्याबळ वाढवेल, अशा नेत्याकडे शहरात पक्षाची धुरा नाही, हे मुख्य कारण आहे. त्यामुळे २०२२ ला हाताच्या बोटावर, तरी मोजता येतील इतके नगरसेवक निवडून येतील की नाही, अशी शिवसेनेतच चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या टेकूची मदत होईल, याच समाधानात सध्या पक्ष शहरात आहे. तर, भाजपची मते विभागणार असल्याने राष्ट्रवादीला शिवसेनेशी आघाडी हवी आहे. कारण २०१७ ला गेलेली सत्ता २०२२ ला पुन्हा मिळविण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे.

घाटाखाली कर्जत, पनवेल आणि उरण, तर घाटावरील मावळ, चिंचवड आणि पिंपरी असे सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाची ताकद मोठी आहे. २००९ स्वर्गीय गजानन बाबर, २०१४ व २०१९ असे सलग दोनदा बारणे असे सलग तीनदा शिवसेनेचे वर्चस्व राहीले आहे. घाटाखाली शेकाप पक्षाची ताकदही चांगली आहे. खासदार बारणे यांनी केलेल्या टीकेमुळे मावळातील महाविकास आघाडीत सर्व अलबेल नाही, असे सिद्ध झाले. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार शिवसेना पदाधिकाऱ्यांची कामे करीत नाही. शिवसेनेला दुजाभाव दिला जातो, असा थेट आरोप त्यांनी केला. यावर राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याने उत्तर दिलेले नाही. शहराचे प्रतिनिधीत्व करणारे पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेही बोलले नाहीत. यापूर्वी माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सुलक्षणा शिलवंत यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्यांशी दोन हात करीत होते. मात्र, ‘टीम गव्हाणे’पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर जाहीर टीका करणाऱ्या बारणेंविरोधात गप्पच असल्याने त्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT