eknathi shinde, ajit pawar, devendra fadavnis  Sarakranama
पुणे

Mahayuti News : महायुतीतील धाकट्या भावांवर 'संक्रात' : 'तिघेच वाटून घ्याल, आम्हाला...'

Political News : महायुतीच्या मेळाव्यात सहभागी झालेले छोटे पक्ष अस्वस्थ...

Chaitanya Machale

Pune News : महाविकास आघाडीच्या विरोधातील वज्रमूठ कडक करण्यासाठी महायुतीत सहभागी असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप यांच्यासह मित्रपक्ष एकत्र आले आहेत. महायुतीतील मित्रपक्षांचा मेळावा नुकताच पार पडला.

महायुतीत सहभागी असलेल्या मोठ्या पक्षांकडून छोट्या पक्षांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात येत असल्याची ओरड सुरुवातीपासूनच होत आहे. या पुढील काळात तरी छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष करू नका, अशी थेट साद या मेळाव्याच्यानिमित्ताने घालण्यात आली. तुम्ही तिघेच (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट) वाटून घ्याल, पण आम्हाला एखादे महामंडळ तरी द्यावे, असे सांगत थेट वाटाघाटीची मागणी या मेळाव्यात जीव टांगणीला लागलेल्या छोट्या घटकपक्षांकडून करण्यात आली.

महायुतीत सहभागी झालेल्या आरपीआय, तसेच इतर मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच कमी स्थान दिले जात असल्याची तक्रार केली जात आहे. मेळाव्याच्यानिमित्ताने हे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. महायुतीच्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही बाब समोर आली होती.

या मेळाव्याच्या बॅनरमध्ये तीन पक्षांच्या नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थान आणि इतर पक्षांच्या नेत्यांना मात्र तळात स्थान देण्यात आले. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर हे फ्लेक्स बदलण्यात आले. रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी कोणतीही चर्चा न करता त्यांचा थेट समावेश माहिती असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेदेखील नाराजी व्यक्त करीत, या मेळाव्यावर बहिष्कार टाकला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुभारंभ मंगल कार्यालयात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात सत्तेत आल्यानंतर केवळ तीन पक्षांनीच पदे वाटून न घेता मित्रपक्ष असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विसरू नका, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनोगत व्यक्त करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांनी 'तुम्ही तिघेच वाटून घ्याल, पण आम्हाला एखादे महामंडळ तरी द्यावे,' असे सांगत थेट वाटाघाटीची मागणीच केली. यामुळे महायुतीमधील भाऊगर्दीने लहान घटक पक्षांचा जीव टांगणीला लागला असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.

दोन्ही दादांची दांडी, आमदार तुपे मात्र उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी महायुतीच्या या पहिल्याच मेळाव्याला दांडी मारली. पालकमंत्री अजित पवार तर या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून येणार होते. मात्र, ते आलेच नाहीत. त्यासोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार संजय काकडे, लोकसभेला इच्छुक म्हणून चर्चा असलेले सुनील देवधर यांचीही अनुपस्थिती या मेळाव्यात होती. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटाकडेही वावर असलेले राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे हे मेळाव्यासाठी हजर होते. त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT