MVA NEWS Sarkarnama
पुणे

MVA News: ...म्हणून महाविकास आघाडीतील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार, 'या' नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

Bjp Vs Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडीच्या हाती काही नाही याची जाणीव नगरसेवकांना आहे...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : एकीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपला (BJP) धक्का देण्यासाठी जोरदार ताकदपणाला लावण्यात आली आहे. मात्र, याचवेळी भाजपच्या नेत्याकडून एक महाविकास आघाडीचं टेन्शन वाढविणारा दावा केला आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळीक यांनी महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहे असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुळीक म्हणाले, महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहे. कारण आता आघाडीच्या हाती काही नाही याची जाणीव नगरसेवकांना आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज लागत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यास ते इच्छुक आहेत, त्यामुळेच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असंही जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले.

यावेळी त्यांनी टिळक कुटंबियांच्या नाराजीवर देखील भाष्य केलं. मुळीक म्हणाले, कसबा पोटनिवडणूक नियोजनाची बैठकीत कुणाल आणि शैलेश टिळक यांनी सहभाग घेऊन पक्षाला पाठिंबा दिला आहे. हेमंत रासने यांचा उमेदवारी भरताना शैलेश टिळक वैयक्तिक कारणामुळे आले नव्हते. पण विरोधकांनीच टिळक कुटुंब नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत.

बंडखोरीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढलं..

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील अंतर्गत धूसफूस बाहेर आली आहे. यामुळे काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यातच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अविनाश बागवे दोघे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू झाल्याने पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसपुढे बंडखोरांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT