Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळविल्यानंतर आता कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना घ्यावा लागणार आहे. अध्यक्षपदासाठी अनुभवी संचालकांना पुन्हा संधी द्यायची की तरुण नेतृत्वाला पुढे आणायचे, असा पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सभासदांसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदाच्या चर्चेत ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे यांची नावे पुढे येत आहेत. दुसरीकडे, तरुण नेतृत्व म्हणून अभिजित काकडे आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. याशिवाय संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्याही नावांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी दोन वेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. संचालक म्हणून त्यांची ही चौथी टर्म आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, कारखान्याच्या कामकाजाची जाण आणि सभासदांशी असलेला संपर्क या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे यांनाही प्रशासकीय आणि राजकीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले असून, कारखान्याच्या संचालकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यामुळे अनुभवी नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास या दोघांच्या नावांचा विचार होऊ शकतो.
मात्र, कारखान्याच्या कारभारात नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय झाल्यास अभिजित काकडे आणि ऋषिकेश गायकवाड यांच्या नावांची चर्चा महत्त्वाची ठरू शकते. दोघेही दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. अभिजित काकडे यांचे जय पवार यांच्याशी असलेले निकटचे संबंधही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत.
अध्यक्षपदाच्या चर्चेत संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांची नावेही समोर येत आहेत. नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष असलेले संग्राम सोरटे यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जाते. तर कोन्हाळे येथील सुनील भगत यांनी चार वेळा संचालक म्हणून काम केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत अनुभव, सामाजिक प्रतिनिधित्व आणि राजकीय समीकरणे यांचा विचार होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. तर योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेही आव्हान दिले होते. या तिरंगी लढतीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळविला. मात्र, निवडणुकीतील एकजुटीनंतर आता पदाधिकारी निवडताना विविध इच्छुकांमधून कोणाची निवड करायची, हा महत्त्वाचा प्रश्न असेल.
सर्व जागांवर विजय मिळविल्यानंतर कारखान्याच्या कारभाराची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी देऊन स्थैर्य राखायचे की तरुण संचालकांना पुढे आणून नव्या नेतृत्वाला वाव द्यायचा, यावरून त्यांच्या निर्णयाची दिशा स्पष्ट होऊ शकते.
अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याचीही उत्सुकता आहे. कारखान्याच्या पाच गटांतील संचालकांना टप्प्याटप्प्याने उपाध्यक्षपदाची संधी देण्याची परंपरा कायम राहणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे जुळविताना काही इच्छुकांना संधी देता आली नसल्याने स्वीकृत संचालकपदांच्या निवडीकडेही लक्ष लागले आहे. कारखान्यातील दोन स्वीकृत संचालकांच्या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू आहे. विक्रम भोसले हे सध्या खरेदी-विक्री संघाचे संचालक आहेत. त्यांचे तेथील पद रिक्त झाल्यास त्या ठिकाणीही नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर आता पदाधिकारी निवडीच्या माध्यमातून नेतृत्वाची पुढील दिशा ठरणार आहे. अनुभवी संचालक, युवा चेहरे आणि सामाजिक प्रतिनिधित्व यांचा समतोल साधताना सुनेत्रा पवार कोणाला संधी देतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.