Someshwar Sugar Factory Election Sarkarnama
पुणे

Someshwar Sugar Factory: अभी नहीं तो कभी नहीं!' सोमेश्वर कारखान्यात विरोधकांचा मास्टरप्लॅन तयार; 'या' मुद्द्यावर घेरण्याची तयारी!

Someshwar Sugar Factory election: सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिरायत-बागायत, सिंचन, सभासदांचे प्रश्न, नाराजी आणि अपक्ष उमेदवारांमुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Someshwar Sugar Factory election news : बारामती तालुक्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता तापू लागली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी विरुद्ध विरोधक अशी पारंपारिक लढत दरवेळी पाहायला मिळते; मात्र यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी अन्‌ विरोधी या दोन्ही गटांतील नाराज, तसेच अपक्ष उमेदवारांच्या वाढत्या संख्येमुळे 'बंडखोरी' आणि 'मतांचे विभाजन' अटळ असल्याचे स्पष्ट राजकीय चित्र समोर येत आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सोमेश्वर कारखान्यावर पवार कुटुंबाचेच एकछत्री वर्चस्व राहिले आहे. कारखान्याचा विस्तार आणि प्रगतीमध्ये अजित पवार यांचे योगदान सर्वश्रुत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अजितदादांच्या अनुपस्थितीतच राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरत असल्याने स्थानिक नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची अन्‌ प्रतिष्ठेची ठरणार आहे.

'जिरायत विरुद्ध बागायत' अन्‌ सिंचनाचा प्रश्न केंद्रस्थानी

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश भाग हा जिरायती पट्ट्यात मोडतो. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील सिंचनाचा आणि पाण्याच्या वाटपाचा प्रश्न ऐरणीवर राहिलेला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रचारात पहिल्यांदाच 'जिरायत विरुद्ध बागायत' असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून कारभारातील त्रुटी, सभासदांच्या प्रलंबित मागण्या आणि स्थानिक पातळीवरील नाराजी कॅश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अभी नहीं तो कभी नहीं'ची भूमिका; अपक्षांचे मोठे आव्हान

यंदा विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून 'अभी नहीं तो कभी नहीं' या भूमिकेतून अनेक इच्छुकांनी थेट रिंगणात उतरण्याची तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांतील नाराजांनी वैयक्तिक पातळीवर सभासदांशी संपर्क अभियान सुरू केले आहे. त्यामुळे अपक्षांची ही वाढती संख्या दोन्ही प्रमुख पॅनेलची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे.

पक्षापेक्षा 'कामाचा माणूस' महत्त्वाचा!

निवडणुकीचे अंतिम चित्र अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होणार असले, तरी गावागावातील गट-तट आणि स्थानिक राजकीय समीकरणे यंदाचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांमध्ये सध्या 'पक्षनिष्ठेपेक्षा आपल्या हक्काचा अन् कामाचा माणूसच निवडून द्यायचा' असा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT