Someshwar Sugar Factory election sarkarnama
पुणे

Someshwar Election: बारामतीत १२ नावांची यादी समोर आली अन् अध्यक्षांनी थेट डावच मोडला! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा मोठा खुलासा

Someshwar Sugar Factory Election: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Sudesh Mitkar

Someshwar Sugar Factory Election: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी समोर नवे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, जगताप यांच्याशी चर्चेचे प्रयत्न झाले, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले.

जगताप यांनी आज वानेवाडी येथे सभासदांचा विशेष मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची चर्चा असल्याने जगताप यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे. जगताप यांच्या भूमिकेचा निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘जगताप असं काही करतील, असं वाटलं नव्हतं’

जगताप यांच्या भूमिकेबाबत बोलताना जय पवार यांनी स्पष्ट केले की, अनेक वर्षांपासून सोमेश्वर कारखान्याच्या संचालकांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाला साथ दिली आहे. पुरुषोत्तम जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असून त्यांनाही अजित पवार यांनी कायम साथ दिली आहे. त्यामुळे ते वेगळी भूमिका घेतील, अशी अपेक्षा नव्हती.

जगताप यांच्याशी संवाद साधण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. काल रात्री उशिरापर्यंत बैठकही झाली. मात्र, काही मुद्द्यांबाबत त्यांच्या मनात खंत असल्याने त्यांनी सोबत येण्यास असमर्थता व्यक्त केली. आजही त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्याचे जय पवार यांनी सांगितले.

नवीन चेहऱ्यांसोबत अनुभवी कार्यकर्त्यांना संधी

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पॅनल निश्चित करण्यात आल्याचे जय पवार यांनी सांगितले. नवीन कार्यकर्त्यांसोबत कारखान्याच्या कामकाजाची माहिती असलेल्या अनुभवी व्यक्तींनाही संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखाना शेतकऱ्यांना चांगला दर कसा देईल आणि भविष्यात तो सक्षमपणे कसा चालेल, याचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे,’ असे जय पवार यांनी सांगितले.

जगतापांनी बंड का केले? जय पवार म्हणाले...

पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका का घेतली? याबाबत जय पवार यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. ‘त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे त्यांनाच विचारले पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप महायुतीमध्ये सोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही घडामोडींनंतर जगताप यांच्यासोबत निवडणूक लढविण्याऐवजी स्वतंत्र नवीन पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवारांचे नाव वापरण्यावरही जय पवारांची भूमिका

सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्याबाबत पक्षाकडून पत्र देण्यात आले आहे. यावर जय पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली. अजितदादांचे नाव वापरून त्यांच्या कुटुंबाला एका बाजूला फटका देणे कोणालाही योग्य वाटणार नाही. गेल्या तीन दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. चर्चेतून काही चांगला निर्णय झाला असता तर चांगले झाले असते, असे ते म्हणाले.

जगतापांवर कारवाई नाही

पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेतली असली तरी त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही काहीही कारवाई करणार नाही. आम्ही सर्वच दादांच्या विचारांचे आहोत. कोणावरही टीका न करता कारखाना आणि बारामतीचा विकास कसा करता येईल, यावर आमचा भर असेल,’ असे त्यांनी सांगितले.

जगतापांच्या १२ नावांमुळं निर्माण झाला पेच

पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांच्या विचारातील १२ उमेदवारांची यादी दिल्याचे जय पवार यांनी सांगितले. मात्र, सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेणे अपेक्षित होते, अशी भूमिका त्यांनी मांडली.यामुळे सोमेश्वरमध्ये उमेदवारांच्या निवडीवरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे. जगताप यांना सोबत घेण्याचे प्रयत्न झाले, मात्र अखेर स्वतंत्र पॅनलच्या दिशेने पावले पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT