Someshwar Sugar Factory has announced a record sugarcane rate of up to Rs 4,000 per tonne for the 2025-26 crushing season, benefiting sugarcane farmers. Sarkarnama
पुणे

Someshwar Sugar Factory : सोमेश्वरने अजितदादांची प्रथा ठेवली कायम! उसाला FRPपेक्षा जास्त दर : टनाला भुवया उंचावणाऱ्या दराची घोषणा

Someshwar Record Sugarcane Rate 2025-26 : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत ऊसदरावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मागील गाळप हंगामात कारखान्याकडे आलेल्या उसासाठी सुधारित दर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jagdish Patil

Pune News, 16 Aug : महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी साखर कारखाने हे केवळ साखर उत्पादनाचे केंद्र नसून ग्रामीण अर्थकारण, शेतकऱ्यांचे हित आणि स्थानिक राजकारणाची समीकरणांशी या कारखान्यांचे घट्ट नाते आहे. त्यामुळे प्रत्येक गाळप हंगामात कोणता कारखाना उसाला किती दर देणार, याकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते.

एखाद्या कारखान्याने जाहीर केलेला उच्च ऊसदर अनेकदा राज्यभर चर्चेचा विषय ठरतो. अशीच चर्चा सध्या पुणे जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सुरू झाली आहे. कारण या साखर कारखान्याने 2025-26 च्या गाळप हंगामातील उसाला विक्रमी दर जाहीर केला आहे. कारखान्याने अनुदानासह उसाला प्रतिटन 4 हजार रुपयांपर्यंत दर जाहीर केला आहे.

त्यामुळे FRP पेक्षा 515 रुपये अधिकचा उसाला दर मिळणार आहे. तर सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची जी परंपरा निर्माण केली, तीच परंपरा कायम ठेवल्याचं दिसत आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत ऊसदरावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मागील गाळप हंगामात कारखान्याकडे आलेल्या उसासाठी सुधारित दर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिन्यानुसार जाहीर झाला ऊसदर

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तुटलेल्या उसाला प्रतिटन 3,800 रुपये दर मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तुटलेल्या उसाला 3,900 रुपये, तर मार्च महिन्यात तुटलेल्या उसाला प्रतिटन 4 हजार रुपये असा सर्वोच्च दर देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारखाना प्रशासनाच्या माहितीनुसार, 2025-26 या हंगामातील एफआरपी प्रतिटन 3,285 रुपये होती. त्याच्या तुलनेत मार्च महिन्यातील उसाला 4 हजार रुपये दर मिळणार असल्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन 515 रुपये अधिक दर मिळणार आहे.

कारखाना प्रशासनाने एफआरपीपेक्षा प्रतिटन 515 रुपये अधिक ऊसदर देणारा श्री सोमेश्वर कारखाना राज्यातील एकमेव साखर कारखाना ठरला असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता सोमेश्वरने जाहीर केलेल्या या दराची राज्यातील सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. 2025-26 च्या गाळप हंगामात कारखान्याने एकूण 12 लाख 98 हजार 559 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. बी-हेवीसह सरासरी 12.27 टक्के साखर उतारा मिळाला असून, 15 लाख 57 हजार 650 साखर पोत्यांचे उत्पादन करण्यात आले.

तसेच कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पातून 12 कोटी 53 लाख 44 हजार 680 युनिट वीज निर्मिती करण्यात आली. त्यापैकी 8 कोटी 36 लाख 70 हजार 480 युनिट विजेची विक्री करण्यात आली. डिस्टिलरी प्रकल्पातून 86 लाख 25 हजार 1 लिटर अल्कोहोल, तर 43 लाख 82 हजार 569 लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले आहे. कारखान्याने आजअखेर प्रतिटन 3,300 रुपये सभासदांच्या खात्यावर जमा केले असून, उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT