Rishiraj Pawar-Rahul Pacharne
Rishiraj Pawar-Rahul Pacharne  sarkarnama
पुणे

कट्टर विरोधक पवार-पाचर्णे यांच्या पुत्रांनी एकत्र येत पाहिला पुष्पा सिनेमा!

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर सध्या अशोक पवार (Ashok Pawar) आणि बाबूराव पाचर्णे (Baburao Pacharne) या आजी-माजी आमदारांमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पवारांचे चिरंजीव ऋषीराज आणि माजी आमदार पाचर्णे यांचे सुपुत्र राहुल यांनी मात्र एका सोहळ्यात एकमेकांची आवर्जून भेट घेत प्रेमाने तीळगुळ देत गोड बोलाच्या शुभेच्छा दिल्या. आमदारपुत्रांच्या या सदिच्छा भेटीतून युवा वर्गामध्ये चांगला संदेश गेला असला; तरी जुन्या-नव्या राजकीय पदाधिकाऱ्यांचे मात्र कान टवकारले आहेत. (Son's of MLA Ashok Pawar and former MLA Baburao Pacharne meet each other)

युवा वर्गाच्या गराड्यात वावरणारे ऋषिराज अशोक पवार नुकतेच एका सोहळ्यानिमित्त शिरूरला आले असताना ज्यूस पिण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांसमवेत ‘फ्रूटॉस’ या ज्यूस बारवर गेले होते. नेमके त्याचवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे हे देखील आपल्या मित्रांसमवेत तेथे आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना पाहताच हसत नमस्कार केला. संक्रांतीच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या. हस्तांदोलन करत एकमेकांना तीळगुळ दिल्यावर जवळच असलेले आपले मल्टीप्लेक्स सिनेमा थिएटर पाहण्यासाठी राहुलदादांनी राजभैयाला निमंत्रीत केले. त्यांनीही आढेवेढे न घेता त्यांचे निमंत्रण स्वीकारले.

पुण्याचा फिल शिरूरमध्ये आणला

थिएटर, तेथील साऊंड सिस्टीम याबाबत राजभैयाने राहुलदादांकडून बारकाईने माहिती घेतली. या थिएटरच्या माध्यमातून तुम्ही पुण्याचा फील शिरूरमध्ये आणला असल्याचे राजभैयाने सांगताच राहुलदादाने थिएटर बंद असूनही आवर्जून त्यांना सिनेमा क्वालीटीची ट्रायल दाखवली. त्यावेळी दोघांनी थिएटरमध्ये शेजारी बसून ‘पुष्पा’ या सिनेमाचा काही वेळ आनंद घेतला. सुमारे अर्धा तासाच्या या भेटीत दोघांनीही एकमेकांची व्यावसायिक चौकशी करताना संबंधितांच्या व्यवसायातील माहिती जाणून घेण्यास प्राधान्य दिले. या दोन्ही आमदारपुत्रांनी 'तिळगुळ घ्या गोड बोला' च्या शुभेच्छा प्रत्यक्षात उतरवताना राजकीय विषय, उणेदुणे, निवडणुका हे विषय चाणाक्षपणे टाळले. आपापल्या वडिलांचा उल्लेखही त्यांनी कटाक्षाने टाळला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अमोल चव्हाण हे देखील त्यांच्यासमवेत होते.

नवी पिढी पुन्हा एकत्र येणार काय

बंद थिएटरमध्ये या दोघा आमदारपुत्रांचा संवाद रंगला असताना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहिल शेख, युवा नेते सागर नरवडे, शिवसैनिक मंगेश कवाष्टे, अक्षय जाधव, शरद पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदारपुत्रांच्या या भेटीची माहिती समजताच शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते थिएटरबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. या दोघांच्या भेटीचे व थिएटरमध्ये एकत्र बसून सिनेमा पाहत असल्याचे फोटोही वेगाने व्हायरल झाले. या भेटीबाबत राजकीय पटलावर बरेच तर्क-वितर्क लढविले जात असून, नवी पिढी दोन्ही दिग्गज नेत्यांना पुन्हा एकत्र आणणार काय, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

अशोक पवार होते पाचर्णेंचे प्रचारप्रमुख

शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर सद्यस्थितीत आमदार अशोक पवार आणि माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यातून विस्तवही जात नाही, हे वास्तव असले तरी या दोघांनी एकेकाळी शिरूर तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत बाबूराव पाचर्णे यांच्या प्रचाराची सारी सूत्रे अशोक पवार यांच्या हाती होती व त्यांनीही अत्यंत जिद्दीने पाचर्णे यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. तालुक्यातील पंचायत समिती व घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणूकीतही पॅनेल टाकून पाचर्णे-पवार यांनी त्याकाळच्या प्रस्थापितांसमोर तगडे आव्हान उभे केले होते.

पाचर्णेंच्या शिवसेनाप्रवेशाने दोघांचा वाटा वेगळ्या

विधानसभेतील ६७८ मतांच्या फरकाने निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर पाचर्णे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथूनच पाचर्णे-पवार यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. पुढे पाचर्णे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर व विविध राजकीय घडामोडींनंतर त्यांच्यातील राजकीय दरी रूंदावत जाऊन विधानसभेच्या सलग तीन निवडणुका त्यांनी एकमेकांविरूद्ध लढविल्या. पवार व पाचर्णे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ या तीन निवडणुकांमध्ये आलटून-पालटून विजय मिळविला असून यात पवार दोनदा; तर पाचर्णे एकदा यशस्वी झाले आहेत. भावी राजकीय वाटचालीत दोघांतील समेटाची सूतराम शक्यता नसताना आणि राजकीय पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले असताना राहुल पाचर्णे व ऋषिराज पवार यांच्या सदिच्छा भेटीने कडवट झालेल्या राजकारणाला संक्रांतीच्या तिळगुळाप्रमाणे तात्पुरता का होईना पण गोडवा आल्याचे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले आहे.

काहींचे चेहरे काळवंडले

तडाखेबाज डायलॉगबाजीमुळे व भन्नाट ॲक्शन सीनमुळे सध्या तरूणाईमध्ये हवा निर्माण केलेल्या पुष्पा या चित्रपटाचा काही भाग राहुल पाचर्णे व ऋषिराज पवार यांनी एकत्रित बसून पाहिला. यातील ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझा क्या, फ्लॉवर नही फायर हू मै... पुष्पा झुकेगा नही साला...’ हे खरमरीत संवाद सध्या चर्चिले जात असले; तरी पाचर्णे-पवार या आमदारपुत्रांमधील संवादात कुठलाही टकराव न होता सुसंवाद घडला. हे दोघे आमदार पुत्र समोरासमोर आल्यावर त्यांच्यात जुगलबंदी होईल, असे उपस्थितांना वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न होता दोघांनी टाळी देत एकमेकांची ख्यालीखुशाली विचारल्याने काहींचे चेहरे मात्र काळवंडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT