शिरूर (जि. पुणे) : आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांचे चिरंजीव ऋषिराज आणि दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांचे चिरंजीव राहुल यांच्या राजकीय पटलावरील अस्तित्व वाढताना दिसत आहे. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना मानणाऱ्या युवा वर्गाच्या राजकीय हालचालींमुळे शिरूर (Shirur) तालुका पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. वडिलांच्या निधनानंतरचे राहुल यांचे राजकारणातील पुनरागमन आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील थेट सहभागातून ऋषिराज यांचे राजकीय आगमन तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. (Sons of MLA Ashok Pawar and former MLA Baburao Pacharne will enter Shirur politics)
शिरूर तालुक्यातून विधानसभेची सहा वेळा निवडणूक लढविलेल्या बाबूराव पाचर्णे यांचा वारसा चालविण्यासाठी राहुल हे सज्ज झाले आहेत. ते तालुक्याच्या राजकारणात कार्यरत होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. वडिलांच्या श्रद्धांजली सभेत ऋण व्यक्त करतानाच्या त्यांच्या वक्तव्यातून या नव्या नेतृत्वाचे राजकीय पुनरागमन अधोरेखित झाले आहे. तेरावा विधीनंतर, त्यांनी लगेचच बाबूराव पाचर्णे यांच्या जीवाभावाच्या लोकांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या व समर्थकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे.
'वडिलांनी जपलेल्या लोकांना मी कधीच विसरणार नाही', असे त्यांनी जाहीर केले आहे. वडिलांना मोठे करण्यात तुम्ही लोकांनी आपल्या सर्वस्वाचे योगदान दिल्याचे सांगताना त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तेव्हा उपस्थितांनाही भावना अनावर झाल्या होत्या. माझे वडील माझ्यासाठी काहीच ठेवून गेले नाहीत, असे मी कधीच म्हणणार नाही. त्यांनी माझ्यासाठी ही अमाप जनसंपत्ती ठेवली असल्याचे आणि हीच संपत्ती मला जपायची असल्याचे आवर्जून नमूद करताना राहुल यांनी पाचर्णे यांचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्याचे सूचित केले.
राहुल पाचर्णे यांनी यापूर्वी दोन जिल्हा परिषद निवडणूका लढविल्या आहेत. त्यामध्ये आलटून-पालटून हार-जीतचा सामना केल्यानंतर गेले चार-पाच वर्षे ते राजकारणापासून काहीसे अलिप्तच होते. सन २०१९ च्या बाबूराव पाचर्णे यांच्या विधानसभेतील पराभवानंतर त्यांचे राजकीय अस्तित्व संपल्यासारखेच झाले होते. अस्तित्व टिकविण्यासाठीचे कुठले प्रयत्नही त्यांच्याकडून या काळात होताना दिसले नाहीत, त्यामुळे बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर शिरूर पंचक्रोशी या त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले होते. मात्र, राहुल यांनी आप्तस्वकीयांबरोबरच मित्रमंडळी, पाचर्णेप्रेमींच्या वाड्या - वस्त्यांवर जावून भेटीगाठी सुरू केल्याने त्यांचे हे राजकारणातील दमदार पुनरागमन मानले जात आहे. राहुल यांच्या भावनिक आवाहनातून त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली असून, भावी राजकीय वाटचालीत त्यांना वडिलांची पुण्याई फलदायी ठरू शकते. बाबूरावांची कमतरता राहुलदादा भरून काढतील, असा आशावादही आता पाचर्णे समर्थकांतून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे ऋषिराज पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर-हवेली तालुक्यांत झंझावाती दौरा काढत मतदार संघातील अनेक गावे पिंजून काढली आहेत. तरूणांच्या गाठीभेटी घेत, जुन्या-जाणत्यांचे आशीर्वादही घेतले. शिरूर, लोणी काळभोर, उरूळी कांचन, सणसवाडी येथील त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास नवतरूणांचे जथ्येच्या जथ्थे उपस्थित होते. 'घ्यावया गरूड भरारी, सोबती आपण सर्व... शिरूर-हवेलीच्या विकासाचे नवे राज पर्व...' अशी टॅग लाईन वापरून साजऱ्या झालेल्या त्यांच्या वाढदिवसाने त्यांची राजकारणात दमदार 'एन्ट्री' झाल्याचे स्पष्ट झाले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरीता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते कारखान्याचे संचालक होण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे.
राहुल पाचर्णे आणि ऋषिराज पवार हे दोघेही उच्चशिक्षित असून, वडीलांचे व्यावसायिक व राजकीय वारसदार होण्यास सक्षम झाल्याचे चित्र आहे. राजकारणात तसे नवखेच असलेल्या दोघांनाही त्यांच्या मित्रमंडळीत 'आरपी' म्हणून ओळखले जाते. मित्र सहकाऱ्यांच्या आग्रहावरून काही महिन्यांपूर्वी दोघांनी एकत्र बसून पुष्पा हा चित्रपट पाहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
राहुल पाचर्णे यांना त्यांच्या मित्रमंडळीत दादा, तर ऋषिराज यांना भैय्या म्हणून संबोधले जाते. दोघांच्या राजकारणातील एन्ट्रीला नव्या नेतृत्वाची सलामी मानले जाऊ लागले असून, छोट्या निवडणूकांतूनच ही दादा-भैयाची जोडी पुढे वाटचाल करील, असे आजचे तरी चित्र आहे. अशोक पवार आणि बाबूराव पाचर्णे हे सुरवातीच्या काळातील राजकारणातील पक्के सहकारी नंतर मात्र कट्टर विरोधक झाले. विधानसभेच्या तब्बल तीन निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवूनही दोघांनी कधीही एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका न करता राजकारणातील सभ्यता पाळली होती. आता या दोघांच्या मुलांची ही नवी जोडी भावी राजकारणात एकत्र नांदताना तीच परंपरा राखणार की खडा विरोध जोपासत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार, हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.