PCMC Municipal Sarkarnama
पुणे

पिंपरी स्थायी समिती लाचखोरी प्रकरण : तो मी नव्हेच, सदस्यांनी हात केले वर 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) `स्थायी`तील टक्केवारीशी सबंध नसल्याचा सदस्यांनी दावा केला आहे.

उत्तम कुटे - सरकारनामा वृत्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC Municipal Corporation) गेल्या महिन्यात एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेताना सत्ताधारी भाजपचे (BJP) स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्ष नितीन लांडगे (Nitin Landge) व पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. शिक्कामोर्तब झालेल्या स्थायीतील या टक्केवारी तथा लाचखोरीशी आपला सबंध नसल्याचा दावा स्थायी समितीच्या सदस्यांनी केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीत त्यांनी त्या १६ पाकिटांशी आपला सबंध नसल्याचे सांगितले.

दरम्यान, फक्त उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या प्रकरणासंदर्भातच एसीबीने ही चौकशी केली. त्याच्याशी आपला सबंध नसल्याचे स्थायीतील तीन स्थायी सदस्यांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्याचा अपवाद वगळता परंपरांगत चालत आलेली व ओपन सिक्रेट असलेली इतर प्रकरणांतील स्थायीतील टक्केवारी उघड होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे स्थायीची ही झाकली मूठ सव्वा लाखाची कायम तशीच राहणार आहे. गरुवारी (ता.२३ सप्टेंबर) भाजपचे तीन सदस्य एसीबीच्या चौकशीला पुण्यात जाऊन आले. फक्त काही मिनीटांत त्यांची चौकशी पूर्ण झाली. तोच कित्ता बाकीचे डझनभर सदस्य सोमवारी (ता.२७) गिरवण्याची शक्यता आहे. कारण ते त्या दिवशी एसीबीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. आपण सोमवारी चौकशीला पुण्यात जाणार असल्याचे राष्ट्रवादी व भाजपच्या एकेका सदस्यांने सरकारनामाशी बोलतांना आज सांगितले.

१८ ऑगस्ट रोजी पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीवर एसीबीची धाड पडली. त्यात, एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेतांना सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापती नितीन लांडगे व पालिकेच्या चार कर्मचारी पकडले गेले होते. त्यात पकडला गेलेला लांडगे यांचा पीए आणि स्थायी समितीतील मुख्य कारकून ज्ञानेश्वर पिंगळे याने घेतलेली लाच तथा निविदा (टेंडर) रकमेच्या दोन टक्के घेतलेली बेकायदेशीर रक्कम (पाकिटे) ही १६ जणांना (स्थायी समितीचे सदस्य) द्यावी लागत असल्याचे चौकशीत एसीबीला सांगितले होते.

एसीबीने स्थाय़ीच्या उर्वरित सर्व १५ सदस्यांना वीस तारखेला नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांना २९ तारखेपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यातील तिघे तीन दिवसांत लगेच जाऊन आले. त्यातील एकाशी आज सरकारनामाने संपर्क केला. त्यावेळी त्यांनी या लाचखोरीच्या प्रकरणाशी आपला काहीच सबंध नसल्याचे एसीबीला सांगितल्याची माहिती दिली. लाच ज्याच्याकडून घेतली तो ठेकेदार व स्थायीचा हेडक्लार्क पिंगळे यांनाही ओळखत नसल्याचे एसीबीला सांगितले, असे हा सदस्य म्हणाला. तीन सदस्यांची चौकशी झाल्याला एसीबीने आज दुजोरा झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT