Rupali Chakankar Sarkarnama
पुणे

भाजप पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या! आता रुपाली चाकणकर अॅक्शन मोडवर

वैशाली नागवडेंना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल

सरकारनामा ब्युरो

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे आहे. त्यांच्याच सहकारी महिलांना मारहाण झाल्यानं महिला आयोग या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं होतं. या प्रकरणात महिला आयोगानंही आता उडी घेतली आहे. महिला आयोगानं म्हटलं आहे की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची बातमी समाजमाध्यमाद्वारे समजली.याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी. तसेच केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत.

वैशाली नागवडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांवर कलम 323 (मारहाण करणे), 354 (विनयभंग), 504, 506 आणि 34 नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईबद्दल वैशाली नागवडे म्हणाल्या की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आहे. या आरोपींना वेळीच अटक व्हायला हवी. पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT