Malegaon sugar factory
Malegaon sugar factory Sarkarnama
पुणे

अजित पवारांच्या कट्टर समर्थकांना साखर आयुक्तांचा दणका!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : बारामती (Baramati) तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Someshwar Sugar factory) कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला (Malegaon sugar factory) जोडण्याच्या विषयाला साखर आयुक्तांनी नामंजुरी दिली आहे. साखर आयुक्तांचा हा निर्णय विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समर्थकांसाठी धक्का मानला जात आहे. पवार यांचे कट्टर समर्थक आणि माळेगाव कारखान्याचे विद्यमान सत्ताधारी यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता, त्यावरून नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत प्रचंड गदरोळ झाला होता. (Sugar commissioner's refusal to add 10 villages of Someshwar factory to Malegaon sugar factory)

भारतीय जनता पक्षाचे नेते रंजन तावरे आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी हा निर्णय दिला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याला बारामती तालुक्यातीलच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे जोडण्याचा विषय ‘माळेगाव’च्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडला हेाता. त्याला माळेगावच्या सभासदांनी प्रचंड विरोध केला हेाता. ती सभा राज्यात गाजली होती. मात्र, त्या गदारोळात सत्ताधाऱ्यांनी तो विषय अवाजी मताने मंजूर केला हेाता.

माळेगाव सहकारी साखर कारखाना सध्या अजित पवार यांच्या गटाच्या ताब्यात आहे. त्या गटाने हा विषय प्रतिष्ठेचा केला हेाता. मात्र, सहकार विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी तो विषय नामंजूर केला आहे. त्यामुळे अवाजी मताने विषय मंजूर करूनही साखर आयुक्त कार्यालयाकडून त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, सोमेश्वर साखर कारखान्याची दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याशी माझा कसलाही संबंध नाही. स्थानिक नेतृत्वाने तो निर्णय घ्यावा, असे अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात सांगितले हेाते.

याबाबत रंजन तावरे म्हणाले की, माळेगावच्या वार्षिक सभेत गावे जोडण्याचा जो विषय हेाता. त्यसंदर्भात लोकशाही मार्गाने सभासदांनी दिलेला कौल, शासन प्रतिनिधींनी दिलेला अहवाल यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने तो प्रस्ताव नामंजूर केला आहे. हा खऱ्या अर्थाने सत्याचा विजय आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रा जनरल बॉडी ही सर्वोच्च न्यायालय आहे, हे दाखवून दिले आहे. माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत जी वार्षिक सभा चालवली आणि त्या सभेत गावे जोडण्याचा विषय फेटाळला. त्या सत्याचा हा विजय आहे. सत्ताधाऱ्यांनी या निर्णयाचा आदर राखून पुढच्या उचापती थांबवाव्यात, अशी मागणीही तावरे यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT