Sugar workers Sarkarnama
पुणे

Sugar workers march : महायुती आमदारांचा पाढाव अन्..; साखर आयुक्तालयावर धडकताच कामगारांचा इशारा

Sugar workers march in Pune : राज्य साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतन वाढीसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला.

Pradeep Pendhare

Pune News : राज्य साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतन वाढीची मुदत सहा महिन्यापूर्वीच संपली असून त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे हा मोर्चा पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला होता.

या मोर्चात तब्बल 40 हजार साखर कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास महायुतीच्या आमदारांचा पाढावा आणि यावेळचा हंगामच बंद ठेवू,असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.

सहचिटणीस आनंदराव वायकर यांनी साखर कामगार नवीन वेतन वाढ सेवाशर्ती, यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत करून वेतन मंडळांनी आचारसंहितेच्या आधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा भाजप (BJP) महायुतीच्या आमदारांच्या विरोधात पाढाव केला जाईल आणि 2024 चा साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद ठेवू, असा इशारा दिला.

पाच हजार अंतरीम वाढ

साखर आणि जोडधंद्यातील कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती ठरविणेबाबत सरकारने ताबडतोड त्रिपक्षीय समिती गठीत करावी व वेतनवाढीचा निर्णय घ्यावा. त्रिपक्षीय समितीचा अंतिम निर्णय होईपर्यंत साखर (Sugar workers) आणि जोडधंद्यातील कामगारांना पाच हजार अंतरीम वाढ देण्यात यावी, साखर आणि जोडधंद्यातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. साखर व जोडधंद्यातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरत्या काम करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे, अशा प्रमुख मागण्यांकडे मोर्चातून लक्ष वेधण्यात आले.

थकीत वेतन द्या

भाडेपट्टयावर, सहभागीदारी तत्वाने आणि विक्री केलेल्या तसेच खासगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. त्यांच्या थकीत वेतनाची रक्कम व्यवस्थापनाकडून अग्रक्रमाने मिळाली पाहिजे. थकीत वेतनासाठी साखर पोत्यांवर टॅगिंग करण्यात यावी. याबाबत स्थानिक संघटनेची मान्यता घेऊनच करार करावा, बंद आजारी साखर कारखाने चालू करण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे किंवा भाडेपट्टयाने चालविण्यास द्यावे. साखर कामगारांचे बऱ्याच साखर कारखान्यांमध्ये पगार थकीत आहेत. या सर्व कारखान्यातील थकीत पगार लवकरात लवकर अदा करून पेमेंट ऑफ वेजेस कायद्यानुसार दरमहा 10 तारखेच्या आत पगार अदा करणेबाबत सर्व कारखान्यांना सरकार व साखर आयुक्त यांचेमार्फत कळविण्याची मागणी करण्यात आला.

पेन्शन मिळावी

ज्या कारखान्यातील कामगारांचे पगार थकविले जातात किंवा थकले आहेत, अशा कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये. साखर व जोडधंद्यातील कामगारांना दरमहा 9 हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन साखर संचालक सूर्यवंशी यांनी स्वीकारून तुमच्या मागण्याचे निवेदन सरकारकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले. महासंघाचे अध्यक्ष पि. के. मुंडे, कार्याध्यक्ष शिवाजी औटी, सरचिटणीस सुभाष काकुस्ते, सरचिटणीस आनंदराव वायकर, कोषाध्यक्ष शिवाजी कोठवळ, भाऊसाहेब बांदल यांच्यासह साखर कामगार मोर्चात सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT