Malegaon, 14 February : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्त झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावीत, अशी मागणी कारखान्याच्या सर्व संचालकांनी एकमताने केली आहे. माळेगाव साखर कारखान्याला राज्यात क्रमांक एकवर नेण्याचा दादांचा संकल्प सुनेत्रावाहिनींनी पूर्ण करावा, अशी अपेक्षाही या संचालकांनी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यास त्यांच्यावर उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष यानंतर त्यांना आणखी एका संस्थेची धुरा स्वीकारावी लागू शकते.
नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ह्या आज (ता. १४ फेब्रुवारी) बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पवार यांनी बारामती आणि इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानेही उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी माळेगावचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे, अशी विनंती केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव सहकारी साखर कारखान्याने केलेली प्रगती, सभासदांचा वाढलेला विश्वास आणि कामगारांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध याची संचालकांनी या वेळी आठवण सांगितली. माळेगाव साखर कारखाना राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा ध्यास अजित पवार यांनी घेतला होता. पारदर्शक, विकासाभिमुख आणि सभासद केंद्रीत कारभाराच्या जोरावर त्यांनी हे साध्य करण्याचे ठरविले होते, हे सांगताना वातावरण भावूक झाले होते.
अजितदादांच्या आठवणींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले. माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, अजितदादांच्या स्वप्नातील माळेगाव कारखाना पुढे नेण्यासाठी त्यांच्या वारशाला न्याय देणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारावे. सर्व सभासदांचीही ती इच्छा आहे.
संचालक मंडळाच्या भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका मांडली. माळेगाव कारखान्याचे सभासद, साखर कामगार आणि संचालक मंडळाचा आग्रह माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत सर्वांशी चर्चा करून आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. अध्यक्षपदाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार करेन, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे आता सभासद व कामगारांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे, संचालक तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, स्वप्निल जगताप, विजय तावरे, शिवराज जाधवराव, नितीन शेंडे, अविनाश देवकाते, रामभाऊ आटोळे, गणेश खलाटे, सतीश फाळके, प्रताप आटोळे, जयपाल देवकाते, ज्योती मुलमुले, रतनकुमार भोसले, राजेंद्र बुरुंगले, विलास देवकाते, देविदास गावडे, विशाल जगताप, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह संचालक उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.