Sunetra Ajit Pawar after being elected unopposed as chairperson of the Malegaon Cooperative Sugar Factory in Baramati during the board meeting held under the supervision of election officer Vaibhav Navadkar. Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

Malegaon Sugar Factory Chairperson : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली. अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कल्याण पाचांगणे, माळेगाव

Malegaon Sugar Factory : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज (ता.12) बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे या आठ महिन्यापासून कार्यरत असल्याने माळेगाव कारखान्याचा कारभार आता खऱ्या अर्थाने महिलांच्या हातात गेला असल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संचालक मंडळाची महत्त्वाची सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे नावडकर यांनी जाहीर केले. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तर अनुमोदन संचालक तानाजी कोकरे यांनी सही केली होती.

या सभेस उपाध्यक्षा सौ. संगिता कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, स्वप्निल जगताप, विजय तावरे, शिवराज जाधवराव, नितीन शेंडे, अविनाश देवकाते, रामदास आटोळे, दत्तात्रेय येळे, गणेश खलाटे, सतीश फाळके, प्रताप आटोळे, जयपाल देवकाते, ज्योती मुलमुले, रतनकुमार भोसले, राजेंद्र बुरुंगले, विलास देवकाते, देविदास गावडे, विशाल जगताप तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.

यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव, अविनाश गोफणे, विनायक गावडे, रविंद्र माने, संजय कोकरे यांनीही उपस्थित राहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, 1 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आज पुन्हा बोलावण्यात आलेल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दिवंगत लोकनेते अजित दादांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.

 दरम्यान,  सुनेत्रा पवार  मागणी महिन्यात  संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. कारखान्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्याचा अजित दादांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारावी, अशी एकमुखी मागणी सभासद आणि संचालक मंडळाकडून वारंवार होत होती. त्या मागणीला आज मूर्त रूप मिळाले.

अजित दादांच्या कार्याची आठवण...

अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखान्याने साधलेली प्रगती, सभासदांचा वाढलेला विश्वास आणि कामगारांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांची आठवण उपस्थितांनी काढली. अजित दादांनी कारखान्याचा कारभार पारदर्शक, विकासाभिमुख आणि सभासदकेंद्रित ठेवत माळेगाव राज्यात अव्वल स्थानावर नेण्याचा ध्यास घेतला होता, असे सांगण्यात आहे. “अजित दादांच्या स्वप्नातील कारखाना पुढे नेण्यासाठी त्यांच्या वारशाला न्याय देणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी सभासदांचीही तीव्र इच्छा होती. आज ती पूर्ण झाली,” असे मत बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे यांनी व्यक्त केले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या,“माळेगावचे सभासद, साखर कामगार आणि संचालक मंडळाचा आग्रह माझ्यासाठी महत्त्वाचा होता. सर्वांशी चर्चा करून आणि परिस्थितीचा विचार करून अध्यक्षपद स्वीकारण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. यापुढे अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT