Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कारखान्याच्या निवडणुकीत गावकी-भावकी, गट-तटाचे राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने सामोरे जाऊया, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. ‘आपल्याला एकत्र काम करायचे आहे,’ या त्यांच्या वक्तव्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होळ येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी कारखान्याची प्रगती आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सूचक भाष्य केले. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर सहकारातील पहिली मोठी राजकीय परीक्षा मानल्या जाणाऱ्या सोमेश्वरच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याने गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. हा आलेख पुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. गावकी-भावकी किंवा गट-तटाच्या राजकारणात न अडकता कारखान्याच्या हितासाठी एकत्र काम केले पाहिजे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
मात्र, ‘आपल्याला एकत्र काम करायचे आहे’ या त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असताना सोमेश्वरच्या निवडणुकीत मात्र स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्याला आगामी राजकीय समीकरणांची नांदी मानायचे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारखाना निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने जे उमेदवार दिले जातील, त्यांच्या पाठीशी सर्वांनी भक्कमपणे उभे राहावे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.
इच्छुक उमेदवारांनी थेट उमेदवारीची मागणी न करता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या पहिल्या पानाची प्रत पक्षाच्या तालुका अध्यक्षांच्या कार्यालयात जमा करावी. हीच पक्षाकडे उमेदवारीची अधिकृत मागणी समजली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोमेश्वर कारखान्याच्या कारभाराकडे काटेकोर लक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे काटकसरीचा कारभार आणि नियोजनाच्या माध्यमातून सोमेश्वर कारखाना राज्यात उच्च स्थानी पोहोचला. दादांनी उंचावलेला सोमेश्वरच्या प्रगतीचा आलेख कायम ठेवण्यासाठी आपले लक्ष राहील, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
सभासद शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच कारखाना परिसरातील गावांच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सोमेश्वरच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांची भूमिका काय राहणार, याची उत्सुकता सभासदांमध्ये आहे. सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वयाची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली असली, तरी प्रत्यक्ष राजकीय आघाडीचे चित्र निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे अजितदादांनंतरच्या सहकारातील या महत्त्वाच्या निवडणुकीत ‘सोमेश्वर’च्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन प्रवाह पुन्हा एकाच वाटेवर येणार का? याकडे आता बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याला पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्यासह कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि पुरंदर, खंडाळा, बारामती व फलटण परिसरातील शेतकरी सभासद उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.