

Shiv Sena UBT Marathwada Protest : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आठही जिल्ह्यात 'तुम से ना हो पयेगा', हे अभिनव आंदोलन हाती घेण्यात आले आहे. 16 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या भागातील रखडलेल्या विकास कामांचा जाब महायुती सरकारला विचारला जाणार आहे.
3 सप्टेंबर रोजी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील विकास कामांच्या योजनांची सद्यस्थिती, निधी अभावी रखडलेली कामे याचे सादरीकरण करण्यात आले होते. डेव्हलपमेंट डिलीट, डेव्हलपमेंट डिनाईड या घोषवाक्यखाली झालेल्या या सादरीकरणाची चर्चा राज्यभरात होत आहे.
मराठवाड्यातील पक्षाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सध्या निधी अभावी रखडलेल्या विकास कामांची पोलखोल करणारे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. 16 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यापूर्वी महायुती सरकार विरोधातील वातावरण आणि रोष कसा वाढेल? याची पुरेपूर काळजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना,परभणी,हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प योजना ज्या जागेवर होणार होत्या थेट त्या ठिकाणी धडक देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती.
44 हजार कोटींची घोषणा मराठवाडा विकासासाठी करण्यात आली होती प्रत्यक्षात मात्र तरतूद 3 हजार कोटींची झाली. प्रत्यक्षात घोषणा झालेल्या योजना प्रकल्प अद्यापही कागदांवरच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. याचीच माहिती आकडेवारी आणि सद्यस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात तब्बल 900 कोटी रुपयांच्या विकास योजना निधी अभावी रखडल्याचा दावा अंबादास दानवे आमदार कैलास पाटील व जालना जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी केला आहे.
यात प्रामुख्याने मत्स्योदरी देवी मंदिर परिसर विकास 40 कोटी, अंबड भूमिगत गटार योजना 16 कोटी 56 लाख, जलशुद्धीकरण केंद्र 56, कोटी जाफराबाद नवीन पाणी पुरवठा योजना 47 कोटी 98 लाख, निम्न दुधना प्रकल्प 728 कोटी 85 लाख आदी विकास कामे मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आली होती. परंतु निधी अभावी ती रखडली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची रखडलेली परिस्थिती सांगितली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सात टीएमसी पाण्यासाठीच्या योजनेसाठी दहा हजार कोटी लागणार आहेत. मात्र वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास या प्रकल्पाची रक्कम कोट्यावधीने वाढणार आहे याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सिंचन कामात मोठा भ्रष्टाचार होत असून सरकारी योजना या भ्रष्टाराचाऱ्यांसाठी कुरण बनले आहेत योजनेचा खर्च वाढत असून त्यावर 16.66 पाण्यावर कोणीही बोलायला तयार नाही असेही पाटील यांनी सांगितले. एकूणच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती सरकारची कोंडी करण्याची रणनीती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आखली आहे. याला सत्ताधारी कसे उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.