Pune News : महापालिकेच्या अर्थसंकल्पात विकासकामांच्या निधीवरून आता राजकीय ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर निधीची उधळण होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना मात्र 'दुजाभाव' सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. या विरोधात आता स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आवाज उठवला असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 'समान निधी' देण्याची मागणी केली आहे.
निधीवाटपात भाजपला 'पाच' तर राष्ट्रवादीला 'तीन'
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या ताज्या अर्थसंकल्पात भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला 5 कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे स्थायी समिती सदस्य आणि पालिकेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर तर 10 कोटींचा वर्षाव करण्यात आला आहे. मात्र, याउलट राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या पदरी केवळ 3 कोटी रुपये पडले आहेत. हा निधीवाटपाचा आकडा समोर आल्यानंतर महापालिका वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे.
सुनेत्रा पवारांचे मुख्यमंत्र्यांना 'सबका साथ'चे आवाहन
निधीवाटपातील हा फरक पाहून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भाजपच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेची आठवण करून दिली आहे. शहरातील कोणत्याही एका भागाला किंवा ठराविक गटाला झुकते माप न देता, सर्व प्रभागांचा विकास समान गतीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना भेदभाव न करता समान निधी देण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
आता सुनेत्रा पवारांच्या या 'लेटर बॉम्ब'नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि निधीचे समान वाटप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हटले आहे नेमके पत्रात ?
पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक पदाधिकाऱ्याकडून निवेदने प्राप्त होत आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर आपण 'महायुती' म्हणून एकत्र काम करत आहोत. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सत्ताधारी आणि मित्रपक्षांच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते विकास आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत गरजा राजकीय पक्षांच्या सीमांपलीकडे आहेत.
कोणत्याही एका प्रभागाला झुकते माप मिळाल्यास दुसऱ्या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून राहू शकतात. तरी 'सबका साथ, सबका विकास' या ध्येयानुसार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या प्रभागासाठी समान निधी देण्यासाठी संबंधितांना योग्य ते निर्देश व्हावेत, ही विनंती. असा पत्र देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.