DCM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Pune: अजितदादांच्या मागे पुण्याचे महत्व कमी करण्याचा डाव? विखे पाटलांच्या निर्णयाला ब्रेक लावण्यासाठी सुनेत्राताईंचे CM फडणवीसांना पत्र

Sunetra Pawar, Water Resources Department, Pune Offices: जलसंपदा विभागाची महत्त्वाची कार्यालये पुण्यातून स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला सुनेत्रा पवार यांनी विरोध केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: पुण्यातील जलसंपदा विभागाची कार्यालये स्थलांतरित करण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे. या निर्णयाला मोठया प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे. यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे पुण्याचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याने घेतलेल्या या स्थलांतराच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पुनर्विचार करावा, अशी विनंती या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रशासकीय कारणांचे दाखले देत जलसंपदा विभागातील अत्यंत महत्त्वाची कार्यालये पुण्यातून इतर जिल्ह्यांत हलवण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुख्य अभियंता कार्यालय थेट कोल्हापूरला हलवण्यात आले आहे, तर विशेष प्रकल्पांच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे पुण्यातून सोलापूर येथे स्थलांतर करण्यात आले आहे.

याशिवाय सांगली जिल्ह्यातील जत येथे 'म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २' चे मुख्यालय कार्यरत करण्यात आले असून, मराठवाड्याचा विचार करता तेथील मुख्य अभियंत्यांचे कार्यालय नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तसेच मराठवाडा विभागातील आणखी १४ इतर कार्यालयांचेही अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. या विखुरलेल्या रचनेमुळे अधिकारी, अभियंते आणि कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासकीय कामकाजात प्रचंड अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट भूमिका मांडली आहे. अधिकारी, अभियंते आणि नागरिकांच्या कामकाजाची सुलभता लक्षात घेता, जलसंपदा विभागाच्या सर्व प्रमुख कार्यालयांचे केंद्रीकरण पुन्हा पुण्यातील सिंचन भवन येथेच करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कार्यालयांचे होणारे स्थलांतर थांबवून एकाच ठिकाणी सिंचन भवन, पुणे येथूनच सर्व प्रशासन चालविणे योग्य ठरेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री या स्थलांतराला स्थगिती देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT