Sunil Shelke Sarkarnama
पुणे

MLA Sunil Shelke News: किशोर आवारे खून प्रकरण; आमदार सुनील शेळकेंना क्लीन चिट? गुन्ह्यात नाव, पण...

Kishor Aware Death Case : तळेगाव दाभाडे पोलिसांनी ८८ दिवसांतच वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट सादर केले.

उत्तम कुटे

Pune Political News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर यांचा १२ मे रोजी चौघांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या 'हाय प्रोफाइल' खुनामुळे मावळासह पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आले. यात मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचे नाव नाही. त्यामुळे या खुनातून त्यांना 'क्लीट चिट' मिळाल्याची मावळात चर्चा आहे. (Latest Political News)

आवारे खुनाचा मुख्य सूत्रधार पकडला गेल्याने शेळके बंधूंच्या 'क्लीन चिट'ची शक्यता बळावली होती. याबाबत दि. ९ जुलै रोजी 'सरकारनामा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आवारे खून प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांनी ८८ दिवसांतच वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट सादर केले. त्यातील नऊ आरोपींत शेळके बंधूंची नावे नसल्याचे या गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि तळेगाव दाभाडे ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. तसेच या गुन्ह्यातून आमदार शेळकेंसह त्यांच्या बंधूंची नावे वगळायची की नाही, हा निर्णय न्यायालय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, पुरावा नसल्याने आरोपपत्रात नाव नसल्याचे बोलले जात आहे. यावर आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, 'अशा दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे खूप वाईट आहे. त्याचा मोठा मनस्ताप मला व कुटुंबाला झाला. या घटनेतून धडा घेत भविष्यात कोणी असे प्रकार करू नये आणि आवारे कुटुंबाबरोबर राहावे,' असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, आवारेंच्या बंधूंच्या खुनाचा बदला खुनानेच घेण्याचा त्यांच्या समर्थक सराईत गुंडांनी रचलेला कटही पोलिसांनी नंतर उधळून लावला. त्यातून मावळात आणखी एक राजकीय खून टाळल्याचा दावाही त्यांनी केला होता.

आवारेंच्या खुनाचा 'सस्पेन्स' दोन महिने कायम होता. त्या प्रकरणातील मारेकरी आणि त्यांना मदत करणारे पकडले गेले, तरी मुख्य सूत्रधार फरार होता. त्यामुळे त्यांचा का खून झाला, हे तोपर्यंत समजले नव्हते, तर त्यांच्या आई आणि माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी शेळके बंधूंनी आपल्या मुलाचा खून घडवून आणल्याची फिर्याद दिली होती. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी केले होते.

दरम्यान, दोन महिने फरार असलेला मुख्य सूत्रधार, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे हा पकडला गेला. त्यानंतर खुनाचे नेमके कारण समोर आले. नगरपरिषदेच्या एका ठेक्यातील वादातून खून झाल्याचे समजले. त्यामुळे शेळके बंधूंना अटक करण्याची आवारे समर्थकांची मागणी थांबली. दुसरीकडे शेळके बंधूंचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात आढळले नाही. त्यामुळे त्यांना पोलिस अटक करू शकत नव्हते. परिणामी ते आवारे समर्थकांच्या रडारवर होते. त्यांनी शेळके बंधूंच्या अटकेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलनही केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT