Pune DPDC : Sunil Shelake :  Sarkarnama
पुणे

Pune DPDC : 'डीपीडीसी'तील मंजूर कामांच्या श्रेयबाजीतून आजी-माजी आमदारांत जोरदार जुंपली!

Sunil Shelake : "पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधे-मधे नाक खुपसू नये.."

उत्तम कुटे

Sunil Shelke Vs Bala Begade News : पुणे जिल्हा नियोजन आणि विकास समितीने (डीपीडीसी) मावळ तालुक्यातील विद्युत विभागाच्या साडेसात कोटी रुपयांच्या कामांना काल मंजुरी दिली. त्यावरून मावळच्या आजी, माजी आमदारांत आज श्रेयाची लढाई रंगलेली दिसली. (Latest Marathi News)

या मंजुरीबद्दल मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आज सकाळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे आपल्या `फेसबुक पेज`वर आभार मानले. मी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रामुळे ही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नंतर `सरकारनामा`ला सांगितले.

त्यावर पुणे `डीपीडीसी`चे निमंत्रीत सदस्य आणि मावळचे भाजपचे माजी आमदार तथा माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे ही मंजूरी मिळाल्याचे दुपारी सांगितले. विद्यमान आमदारांनी या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांत मावळच्या जनतेची दिशाभूल करू नये, असा टोला त्यांनी लगावला. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम आमदारांनी बंद करावे अन्यथा, पुराव्यानिशी तोंडावर पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधे-मधे नाक खुपसू नये :

भेगडेंच्या टीकेचा समाचार आमदार शेळके यांनी संध्याकाळी लगेचच घेतला. पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये, असा हल्लाबोल त्यांनी भेगडेंचे नाव न घेता केला. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

पालकमंत्री,खासदार, आमदार व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सुचविल्यानुसार डीपीडीसीत कामे मंजूर होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात आणि केंद्रात तुमचे सरकार असल्याने तुमचे वजन आणि संबंध वापरुन जी दहा कामे तालुक्यातील सुचवली आहेत. ती मार्गी लावा,असे आव्हानही त्यांनी भेगडेंना दिले आहे.

किरकोळ कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. मावळच्या जनतेने दहा वर्षे आपल्याला आमदार म्हणून संधी दिली, त्यावेळी आम्ही तुमच्या कामात हस्तक्षेप केला नाही. आता आम्हाला ही संधी मिळाली असल्याने त्यात नाक खूपसू नका, असा असा टोला शेळकेंनी भेगडेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT