Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule : भिमाशंकरचा प्रश्न सुळेंनी मांडला; पण विश्वस्थ वळसे-आढळरावांच्या मौनाने आंबेगाव हळहळला !

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule : महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून भिमाशंकरचा उल्लेख आसाम सरकारने त्यांच्या डाखिनी हिलवरील कामरुप याचा केल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट ट्विट करीत हा प्रश्न राज्यभरातील भाविकांसह थेट शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढे मांडला.

मात्र या देवस्थान समितीवर तब्बल १७ वर्षे विश्वस्थ म्हणून राहिलेले माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सध्याच्या समितीवर विश्वस्थ असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे दोघेही अगदी मौन पाळून आहेत. या दोघांचेही मौन महाराष्ट्राच्या आणि भिमाशंकर भाविकांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, हा प्रश्न आत्ताच उपस्थित का झाला याबद्दलही अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून भिमाशंकरचा उल्लेख आसाम सरकारने त्यांच्या डाखिनी हिल वरील कामरुप येथे दाखवून तिथे देशाभरातील पर्यटकांना जाहीर निमंत्रण एक जाहीरात प्रसिध्द करुन देण्यात आलेले आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा शर्मा यांनी स्वत: राज्य सरकारच्या वतीने वरील उल्लेख केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया दिली आहे.

मात्र हा प्रश्न आत्ताच का उपस्थित झाला याबाबत भिमाशंकरमधील अनेक जण खाजगीत सांगतात की, याबाबत भिमाशंकर देवस्थान ट्रस्टला यापूर्वी याबाबत अनेक वेळा सदर वस्तुस्थिती सांगितली होती. भिमाशंकर हे मुख्य पीठ असून, आसाममध्ये भिमाशंकरचेच उप-पीठ आहे. मात्र ट्रस्टकडून कधीच याबद्दल बोलले गेले नाही की, जाहीरपणे मुख्यपीठ असल्याचा कधी दावा केला गेला.

भिमाशंकरचे उपपीठ हे आसामध्ये असून, त्यावर आपल्या (महाराष्ट्र) वतीने भिमाशंकर देवस्थान ट्रस्ट, महाराष्ट्र सरकार वा महाराष्ट्रातील धार्मिक संस्था काहीच बोलत नसल्याने, त्याचा गैरफायदा आसाम सरकारने घेतलाय.

गिता प्रेसच्या पुस्तकाचे गौडबंगाल काय...?

'गीता प्रेस' ही उत्तर भारतात एक धार्मिक मोठे असे प्रकाशन आहे की, त्यात खूप काही पुराव्यांच्या आधारे धार्मिक गोष्टींचा उहापोह केला जातो, काही आख्यायिका मांडल्या जातात. उपलब्ध माहितीनुसार गिता प्रेसने एका फोटो-स्टोरी प्रकारच्या पुस्तकांत भिमाशंकरबद्दल उल्लेख केला गेलाय, तो साधारण २५ वर्षांपूर्वी. याबद्दलचे एक पुस्तही भिमाशंकरमधील काही स्थानिक भाविकांनी काही तत्कालीन अध्यक्ष-विश्वस्थांना समोर आणून त्यावर आक्षेपही नोंदविले होते.

या पुस्तकावरुन आसाम सरकारसह गीता प्रेसला कायदेशीर नोटीस बजावण्याचीही तयारी भाविकांनी दर्शविली होती. मात्र या प्रश्नी भिमाशंकर देवस्थान ट्रस्ट कधीच गंभीर राहिले नाही. पर्यायाने याचाच फायदा आसाम सरकारने घेतल्याचा दावाही भिमाशंकर मधील काही भाविक तसेच आंबेगाव, जुन्नर व खेड मधील काही भाविक नाव न सांगण्याच्या अटीवर करीत आहेत.

वळसे-आढळरावांचे मौन गंभीरच..!

भिमाशंकर हे आंबेगाव तालुक्यात येत असल्याने येथील दोन बडे नेते म्हणजे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील. गंमत म्हणजे वळसे पाटील हे तब्बल १७ वर्षे म्हणजेच सन २००० ते २०१७ पर्यंत भिमाशंकर देवस्थान ट्रस्टवर विश्वस्थ व अध्यक्ष होते तर सन २०१७ पासून श्री आढळराव-पाटील हे विश्वस्थ आहेत.

गंमत म्हणजे ज्या मंचर शहरातून भिमाशंकर देवस्थानकडे संपूर्ण देशभरातील भाविक भिमाशंकरकडे जातात, त्याच मंचरमध्ये या दोघांचे राजकीय बडे प्रस्थ आहे. एवढे असतानाही बारामतीच्या खासदार या विषयी बोलतात आणि या प्रश्नी चिंता व्यक्त करताना दोघाही पाटलांचे मौन भिमाशंकर भविकांसाठी गंभीरच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT