Supriya Sule, Renu Dubey
Supriya Sule, Renu Dubey Sarkarnama
पुणे

Indian Railway : बारामतीहून मुंबईला रेल्वे सुरू करण्यासाठी सुप्रिया सुळेंनी दिला 'हा' पर्याय!

सरकारनामा ब्युरो

Baramati to Mumbai Railway : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.

भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे (Renu Dubey) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी सुळे म्हणाल्या की, बारामती (Baramati) परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत असतात. बारामती एमआयडीसीतही अनेक कामगार काम करत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बारामतीहून मुंबईला आणि मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे.

या प्रवासाठी केवळ एसटी बसशिवाय पर्याय नाही. बस प्रवासाची सेवा खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बारामती ते मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी दुबे यांच्याकडे केली आहे.

प्रगती एक्सप्रेस (Pragati Express) आणि डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) सध्या पुण्यातून सुटतात. या गाड्या सुटण्याची वेळ पहाटे आणि सकाळी लवकर आहे. त्यामुळे बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या बहुतांश वेळा सापडतच नाहीत

बारामतीहून एसटी किंवा अन्य वाहनाने पुण्यात येणे आणि इथून त्या गाड्या पकडणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी एका दिवसात होणाऱ्या कामासाठी अनेकांना किमान दोन दिवस द्यावे लागतात, किंवा थेट एसटीने जाऊन खर्चिक प्रवास करावा लागत असल्याचे सुळे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

ही बाब लक्षात घेता सुळे यांनी रेल्वेकडे पर्याय दिला आहे. त्यांनी प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस पुण्याऐवजी बारामतीहून पहाटे पाच वाजता सोडावी. त्यामुळे ती गाडी पुण्यात तिच्या नियोजित वेळी येईल. तसेच बारामती परिसरातील प्रवाशांचाही वेळ आणि खर्चही वाचेल. असा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रेणू दुबे यांच्याकडे सादर केला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बारामतीहून पहाटे पाचच्या दरम्यान प्रगती किंवा डेक्कन दोनपैकी एक गाडी सोडावी. ती गाडी पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल. त्यानंतर नियोजित वेळेनुसार पुण्यातून मुंबईकडे रवाना होईल. तसेच मुंबईहून परतताना तीच गाडी बारामतीकडे मुक्कामी आल्यास अनेकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ देखील वाचणार असल्याने ही सेवा लाभदायक ठरेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT