Supriya Sule Sarkarnama
पुणे

fuel crisis India : सुप्रिया सुळे यांचे सरकारला पत्र अन् गेमच पलटला; सत्ताधारी पडले कोड्यात ?

Maharashtra politics News : पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आधी महागाई गगनाला भिडवायची आणि आता जनतेला काटकसरीचे सल्ले द्यायचे," अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेल काटकसरीने वापरण्याचे आवाहन केल्यानंतर, देशभरासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आधी महागाई गगनाला भिडवायची आणि आता जनतेला काटकसरीचे सल्ले द्यायचे," अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. इंधनाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, त्यामुळे लोक आधीच त्रस्त असताना असे आवाहन करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणं आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत करत तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शासकीय स्तरावर इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी सत्ताधारी मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. तसेच अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास सुरू केला आहे.

एकीकडे विरोधी पक्षाने आक्रमक होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र एक अत्यंत वेगळी भूमिका घेत सत्ताधारी कोड्यात टाकले आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट आपली सुरक्षा आणि वाहने परत घेण्याचे पत्र सरकारला दिले आहे.

या संदर्भात सुळे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणल्या, "सध्या भारतासमोर भीषण आर्थिक तसेच उर्जासंकट उभा राहिले आहे. परिणामी इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावीत.

देशावरील उर्जा आणि आर्थिक संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेंव्हा अगदीच गरज भासल्यास ती पुन्हा बहाल करण्याचा विचार करावा. परंतु सद्यस्थितीत आपण कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि गाड्या काढून घ्याव्यात असे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षातीलच नेते क्लीन बोल्ड झाले असल्याचे बोलले जात आहे.

SCROLL FOR NEXT