Supriya Sule Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : केंद्राच्या योजनांत उघडपणे दुजाभाव; सुप्रिया सुळेंनी केला गंभीर आरोप

Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनासाठी निधी वाटप करताना उघडपणे दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सध्या सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या निवडणूकमय झाले असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनासाठी निधी वाटप करताना उघडपणे दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड-उघड दुजाभाव केला जात आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि पूर्वतपासणी झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला निधी नसल्याचे कारण दिले असून त्याच वेळी आपल्याच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मात्र येत्या 17 सप्टेंबर रोजी या योजनेतील साधने वाटप होत आहेत. हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून तातडीने निधी उपलब्ध करून दिला नाही, तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला आहे.

तोंडे पाहून विद्यमान सरकार देशातील गोरगरीब जनतेला न्याय देते का, असा संशय येण्यासारखी परिस्थिती उघड दिसत आहे. वयोश्री आणि एडीप योजनेतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने मिळावीत, यासाठी बारामती तालुक्यातील सर्व गावांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांची पूर्वतपासणी झाली आहे. त्यांना साधने मिळावीत यासाठी गेली दोन वर्षे आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यात या योजनांचे काम अतिशय उत्तम झाले आहे. जिल्ह्याभरात पुर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. परंतु दोन्ही योजनांखाली वितरीत होणाऱ्या सहाय्यभूत साधनांचे वाटप निधीअभावी अद्यापही करता आले नाही. यासाठी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार (Virendra Kumar) यांची वारंवार भेट घेऊन पाठपुरावा केला, आंदोलन केले, संसदेत प्रश्न मांडला. परंतु आम्हाला ‘निधी उपलब्ध नाही’ असे कारण वारंवार दिले जाते.

एकीकडे निधीच्या अभावी साधनांचे वाटप रखडले असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मात्र एडिप योजनेच्या अंतर्गत 17 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येत आहे. जर केंद्र सरकारकडे सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यासाठी निधी नाही तर एकाच तालुक्यासाठी साधनांचे वाटप करण्यासाठी तो कसा उपलब्ध झाला?, असा सवाल खासदार सुळेंनी उपस्थित केला आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा

केवळ सत्तेच्या जवळ असणाऱ्यांनाच जाणिवपूर्वक निवडून निधी दिला जात असून इतरांना मात्र वंचित ठेवले जात असून हा दुजाभाव अक्षम्य आहे. शासनाने बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ‘वयोश्री’ आणि ‘एडिप’ च्या लाभार्थ्यांना सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची गरज आहे. अन्यथा, आम्हाला यासाठी पुन्हा एकदा लाभार्थ्यांसह आंदोलन करावे लागेल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT