chhagan bhujbal sharad pawar supriya sule.jpg sarkarnama
पुणे

Supriya Sule : भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर, सुप्रिया ताईंचे डोळे विस्फारले

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी गेले आहेत. शरद पवार यांची वेळ न घेताच भुजबळ 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. "भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटण्यास गेले आहेत? मला माहिती नाही?" अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी यांनी व्यक्त केली आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या, "भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटण्यास गेले आहेत? मला माहिती नाही? मी तुमच्याकडून ऐकत आहे. मी पुण्यात आहे, साहेब मुंबईत आहे. साहेब यशवंतराव चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हते. मला घडामोडीची माहिती नाही."

"छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची महायुतीत हेळसांड होते, याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोण येणार, याचा निर्णय संघटना घेते. कोणी एक व्यक्ती हा निर्णय घेत नाही," असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

भुजबळ रविवारी काय म्हणाले होते?

"आरक्षणाबाबत सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. मात्र आयत्या वेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला," असं म्हणत भुजबळांनी बारामतीतील 'जनसुराज्य रॅली'तून शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं.

या भेटीवर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, "लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कुणी-कुणावर टीका करावी, याला लोकशाहीत बंधने नाहीत. फक्त ती टीका खालच्या पातळीवर, वैयक्तिक असून नये. बारामतीत छगन भुजबळांनी जे विधान केलं, त्यात काहीही तथ्य नव्हतं. सर्वपक्षीय बैठकीला जावा किंवा जाऊ नका, असं आम्हाला कुणीही सांगितलं नाही."

"गेल्या दीड वर्षात विरोधी पक्षाला सरकारनं सामीलच करून घेतलं नव्हतं. आता कशाला सरकारला विरोधी पक्षाची गरज आहे? त्यासाठी शरद पवार यांनी विरोधी पक्षाच्या बैठकीला जाऊ नये, हे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी-कुणाचा द्वेष करत नाहीत. रविवारी भुजबळांनी टीका केली, तरी ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले आहेत. ही शरद पवार यांची उंची आहे. काल टीका झाली म्हणून आज शरद पवार कुणाला भेटणार नाहीत, असं होणार नाही. शरद पवार यांना छगन भुजबळ हे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. फक्त भेटीचं कारण मला माहिती नाही," असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT