Supriya Sule  Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : '...त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांकडून 33 टक्के आरक्षणाची मागणी ' ; सुप्रिया सुळेंचं विधान!

Sudesh Mitkar

Pune Political News : मागील काही दिवसांपासून भाजपामध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू आहे. या पक्ष प्रवेशामुळे भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ असल्याचे असल्याची कुजबुज आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे कार्यकर्ते पक्ष अंतर्गत आरक्षणाची मागणी करत असल्याबाबतचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी बारामती मतदारसंघातील मुळशी आणि पुणे भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मला भाजपाचं विशेष वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी पार्लमेंटमध्ये एक व्हाईट पेपर आणला होता. त्यामध्ये आदर्श हा मोठा घोटाळा असल्याचे भाजपाचे मंत्री आणि खासदार बोलले होते आणि आता अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केला आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 'काही काळापासून भाजपची ही रणनीती ठरली आहे . खोटे किंवा खरे आरोप करायचे त्यानंतर त्या नेत्याच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमेरा लावायचा आणि नंतर त्याचा भाजपा प्रवेश करायचा. काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत या घोषणा भाजपाने देऊन लोकांचे फसवणूक केली असून सध्या महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झाले आहे.' अशी टीका सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी यावेळी केली.

भाजपामध्ये आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मला नुकतीच एक नोट आली असून त्यामध्ये भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते, नेते काम करत आहेत. त्यांच्यासाठी 33 टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण बाहेरून आलेल्यांना संधी मिळते ज्यांनी सतरंज्या उचलल्या ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, पक्ष जेव्हा संकटात होता जेव्हा सत्तेत नव्हता तेव्हा त्यांनी संघर्ष केला. कष्ट घेतले त्यांना काहीच मिळत नाही.'

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) त्यातीलच एक असून त्यांनी 105 आमदार निवडून आणले मात्र सध्या ते अर्धे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे.' असं माझं मत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणल्या.

'अशोक चव्हाण यांच्या समवेत अन्य काही आमदार गेले तरी राज्यसभेसाठी लागणारी मॅजिक फिगर आमच्याकडे आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी आम्हाला कोणतीही चिंता नाही.' असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

तसेच, 'पुणे शहरांमध्ये पाण्याची समस्या,कचऱ्याची समस्या आणि गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नागपूर, पुणे आणि ठाणे या ठिकाणी गुन्हेगारी वाढली असून सध्या राज्यात गोळीबार सरकार आहे.' टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

बारामती लोकसभेसाठी उमेदवारी मागितली -

याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरती बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या 'महाविकास आघाडीकडून मी लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. मागील पंधरा वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सलग आठ वर्ष आकडेवारीवरून मला संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे मेरिटवर मला बारामती मतदारसंघातील लोकांनी मतदान करावं.' असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी मतदारांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT