supriya sule-sanjay jagtap Sarkarnama
पुणे

सुप्रिया सुळे, आमदार जगताप यांचा वीजबिलासाठी असाही पुढाकार : एक कोटीच्या मदतीची घोषणा

त्या खात्यावर येत्या गुरुवारपर्यंत एक कोटी रुपये जमा केले जातील.

दत्ता जाधव

माळशिरस (जि. पुणे) : पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप हे पुढे सरसावले आहेत. त्यांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या वाढीव विजबिलाचा बोजा उचलण्याची घोषणा केली असून त्यासाठी एक कोटी रुपयांचे भागभांडवल देण्याचे जाहीर केले आहे. (Supriya Sule, Sanjay Jagtap will give one crore for electricity bill of Purandar Upsa Irrigation Scheme)

पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत आमदार संजय जगताप यांनी सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) शिंदवणे घाटावरील पंपगृहावर शेतकरी व अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पावसाअभावी पुरंदर तालुक्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने पुरंदर उपसा सिंचन योजनेतून टंचाईच्या भागात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. नव्या दर आकारणीमुळे वाढीव वीजबिलाचा बोजा शेतकऱ्यांवर पडत आहे. हा भार (वाढीव फरकाचा बोजा) उचलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आपण स्वतः (संजय जगताप) एक कोटी रुपयांचे भाग भांडवल देणार आहोत, असे आमदार जगताप यांनी सांगितले. लाभार्थी गावांतील पंधरा जणांची समन्वय कमिटी स्थापन करून या कमिटीचे खाते बॅंकेत उघडण्यात येईल. त्या खात्यावर येत्या गुरुवारपर्यंत एक कोटी रुपये जमा केले जातील, असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

आमदार संजय जगताप म्हणाले की, कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागील दोन वर्षांत योजनेला देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, लवकरच या कामासाठीदेखील निधी उपलब्ध होईल. शेतकरी व अधिकारी यांनी समन्वय ठेऊन योजना चालवावी.

दत्ता झुरंगे यांनी योजनेच्या दुरूस्तीसाठी मागील काही वर्षांपासून निधी मिळाला नाही, त्यामुळे या कामासाठी साठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे यांनी अजूनही फक्त ३५ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळत आहे. संपूर्ण क्षेत्रातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, गणेश जगताप, कार्यकारी अभियंता महेश कानेटकर, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, विकास इंदलकर, एकनाथ यादव, प्रकाश कड, देवीदास नाझीरकर, बाजीराव कुंजीर व लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT