पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे पालकत्व स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) कारखान्याच्या व्यवस्थापनाबाबत काही मुद्दे उपस्थित करत कारखान्याला यापुढे आर्थिक मदत करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. मागे दिलेल्या पैशाचे काय झाले असा सवालही त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळाला विचारला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केलल्या प्रश्नांमुळे विठ्ठल परिवारात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. (What happened to the money given earlier to Vitthal Sugar Factory: Ajit Pawar)
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने अजित पवार सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी विठ्ठल कारखान्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा अजित पवार यांनी कारखान्याला मागे दिलेल्या पैशाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत टाळी एका हाताने वाजत नाही, असे म्हणत कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांना चांगले फटकारले.
पंढरपूर तालुक्याचा आर्थिक आणि राजकीय कणा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना गैरव्यवस्थापनामुळे अडचणीत आला आहे. यावर्षी तर व्यवस्थापनाच्या दुर्लक्षितपणामुळे कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान प्रचारात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठल कारखान्याचे मी पालकत्व घेतले असून कारखाना सुस्थित आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले होते.
निवडणुकीनंतर कारखाना सुरु होणे अपेक्षित होते. मात्र कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळाला शेवटपर्यंत कारखाना सुरु करण्यात यश आले नाही. मागील गाळप हंगामातील शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम आणि कामगारांचे वेतन थकीत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने करुनही पदरी काहीच पडले नाही. मागील काही महिन्यांपासून कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके हे शेतकरी व कामगारांच्या संपर्कात नाहीत. सतत नाॅट रिचेबल असलेल्या भगिरथ भालके यांच्याविषयी राष्ट्रवादी पक्षात व शेतकरी, सभासदांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, मध्यंतरी कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अंतर्गत वादामुळे काही संचालकांनीच त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. परिणामी चांगला साखर कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की कारखान्याचे अध्यक्ष भालके व त्यांच्या संचालक मंडळावर आली आहे.
या वेळी पवार म्हणाले, ज्या सहकारी संस्थांना त्यांच्या काही चुका नसताना मदत करणे गरजे होते, त्यांना मदत केली आहे. परंतु संस्थाचालकांनी व संचालक मंडळांनी ती संस्था चांगली चालली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. टाळी एका हाताने वाजत नाही. मध्यंतरी कल्याणराव काळे व इतरांना सरकारने मदत केली. मागेदेखील विठ्ठल कारखान्याला पैसे दिले होते. त्याचे काय झाले, शेवटी जनतेचा पैसा आहे. भारत भालके होते, त्यावेळी ही पैसे दिले होते. पांडुरंगाच्या नावाचा हा कारखाना आहे. त्या नावाला साजेस असेच काम केले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.