Supriya Sule Sarakrnama
पुणे

Supriya Sule : संसदेत राष्ट्रवादीला कार्यालय मिळताच सुप्रिया सुळेंनी दाखवले 'मेरीट'

मिलिंद संगई

Baramati News : आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्ष करीत आहेत. तर दुसरीकडे लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव देताना केलेली चूक दुरुस्त करीत शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा केला आहे. त्यामुळे शरद पवार गटात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे.

केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजिजू हे संसदीय कार्यमंत्री आहेत. आमचे विरोधक असले तरी आम्ही काही वर्ष सोबत संसदेत काम करत आहोत. काही बिले पास करायची असतील तर देशहित विचारात घेत आम्ही एकत्र काम करतो. माझे व त्यांचे चांगले संबंध आहेत. बिजू जनता दल व राष्ट्रवादी कॉंग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्ष हे दोनच पक्ष असे आहेत जे संसदेत कधीच वेलमध्ये आंदोलनासाठी जात नाहीत. संसदीय प्रथेनुसारच आम्ही काम करतो. आज आम्हाला संसदेत जे कार्यालय मिळाले ते आमच्या मेरीटवर मिळाले असल्याचे खासदार सुळे (Supriya sule) यांनी स्पष्ट केले. (Supriya Sule News)

बारामतीतील तीन हत्ती चौकाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. ज्या चुकीच्या पध्दतीने इनकमटॅक्स, ईडी व सीबीआयचा चुकीचा वापर करत अदृश्य शक्तींनी ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा पक्ष व घरे फोडली, याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत दिले आहे. आमची न्यायालयीन लढाई सुरुच आहे, वेळ लागला तरी आम्ही लढू, आमच्याबाबत अदृश्य शक्तीने जे केल ते इतरांबाबत होऊ नये यासाठी ही लढाई आहे, असेही त्या म्हणाल्या.

मागितले असते तर सगळे दिले असते...कोणत गठुड आम्हीवर घेऊन जाणार आहोत, खाली हाथ आये है, खाली हाथ जाते है... पण ज्या चुकीच्या पद्धतीने शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसे आहोत, आम्हाला लढायला शिकवले आहे. महाराष्ट्र व देशाचे राजकारण या मंडळींनी गलिच्छ करुन ठेवलेले आहे. त्यांच्या विरोधात कोणीतरी लढलच पाहिजे. सगळ्यांनी हो ला हो म्हणून चालणार नाही, म्हणून आमची लढाई सुरु आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यावर सर्व्हे येतात. त्या मुळे राज्य सरकारची धावपळ सुरु असून निवडणूका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकप्रिय शासकीय अध्यादेश काढण्याचा सपाटा सुरु आहे. त्यात मला फार काही आश्चर्य वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरन्यायाधिशांच्या घरी पंतप्रधान गणेशोत्सवानिमित्त गेले, या बाबत विचारता त्या म्हणाल्या, 'ही दोन्ही खूप मोठी माणसे आहेत. मी लहान तोंडी मोठा घास घेणे बर नव्हे, पण मलाही याचे थोडे आश्चर्य वाटले पण माझा न्यायालयावर विश्वास आहे. सरन्यायाधिशांनी जे काही केले ते विचार करुनच केले असेल, माझा सरकारवर विश्वास नाही पण न्यायालयावर निश्चित विश्वास आहे.

काही आमदार शरद पवार यांना सोडून गेले असले तरी संघटना आज शरद पवार यांच्यासोबतच आहे, त्या मुळे संघटनेला अधिक महत्व असते, तसेच शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या हयातीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली होती. त्या मुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे. राज ठाकरे बाहेर पडले त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला, जे संविधानानुसार योग्य होते, प्रत्येकाला पक्ष निर्मितीचा अधिकार निश्चित आहे.

प्रत्येक गोष्टीत राजकारण नको.....

राज्याच्या हितासाठी अर्थमंत्रालय आक्षेप नोंदवित असतानाही निर्णय होणे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने चिंताजनक आहे, कधीतरी या राज्याचा व लोकांचाही सरकारने असे निर्णय घेताना विचार करावा, प्रत्येक गोष्टीतच राजकारण नको, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT